प्रतिनिधी/ बेळगाव
कोविड-19 च्या संकटछायेत अकरावी पुरवणी परीक्षा रद्द करण्यात आली असून अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट बारावीत प्रवेश देण्यात येणार असल्याचे कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना 16 जुलै ते 27 जुलै दरम्यान अकरावीची पुरवणी परीक्षा घेणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असून परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
फेबुवारी 2020 मध्ये अकरावीची परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल जूनमध्ये जाहीर करण्यात आला. सदर परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन स्तरावर पुरवणी परीक्षा घ्यावी, असा आदेश काढण्यात आला होता.
मात्र, परिस्थिती विचारात घेता परीक्षेला हजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करत बारावीच्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना थेट बारावीत जाण्याच्या संधीपासून वगळण्यात आले आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पूर्वीच्या परीक्षेवर आधारित गुण देऊन महाविद्यालयीन स्तरावर उत्तीर्ण प्रक्रिया पूर्ण करावी, असे देखील कळविण्यात आले आहे. यामुळे पुरवणी परीक्षा द्यावी लागणाऱया विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.









