2016 साली ’उडता पंजाब’ नावाचा एक हिंदी सिनेमा आला होता. अनुराग कश्यप, एकता कपूर, विकास बहल इत्यादी निर्मित हा सिनेमा पंजाबमधील अंमली पदार्थांच्या वाढत्या व्यसनावर आधारित आहे. मादक पदार्थांच्या काळय़ा बाजाराचे भीषण रूप पाहून अंगावर काटा येतो. मजुरापासून ते कलाकारापर्यंत अनेक माणसं या मादक पदार्थांच्या आहारी गेलेले आपल्याला दिसतात. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या अहवालानुसार 2017-19 मध्ये तब्बल 2300 लोकांचा मादक पदार्थांच्या अती सेवनामुळे मृत्यू झाला. तरी पण अंमली पदार्थांचा काळा बाजार वाढतच चालला आहे. त्यांचा प्रसार आता तरुणांमध्ये अधिकरित्या होताना दिसत आहे.
‘उडता पंजाब’मध्ये जेव्हा आपण अगदी 18-20 वयोगटातील मुलामुलींना व्यसनमुक्तीसाठी साखळीने दिवाणाला बांधलेले बघतो, तेव्हा या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते. ऊर्जेने, विशेष प्रतिभेने भरलेली मुलं मुली या विनाशक विषाच्या आहारी जात आहेत. ज्या वयात तरुणांनी स्वतःचे व्यक्तिमत्व घडविले पाहिजे, जग बघितले पाहिजे आणि उच्च शिक्षण प्राप्त करून जगाच्या विकासात हातभार लावला पाहिजे त्या वयात ही मुलं स्वेच्छेने काही मोहक क्षणांसाठी शारीरिक आणि मानसिक इजा करून घ्यायला तयार झाली आहेत. ‘उडता पंजाब’ सिनेमाने या काळय़ा बाजाराबद्दल जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.
भल्या भल्या लोकांनी या व्यसनाच्या आहारी जाऊन आयुष्याचे वाटोळे केले आहे. एवढेच नव्हे तर क्षणभर मोहापायी आपले कुटुंबदेखील उद्ध्वस्त केले आहे. ही एक संतापजनक गोष्ट नसून चिंताजनक गोष्ट आहे. समाज म्हणून आपण आपल्या माणसांकडे आणि होणाऱया गैर व्यवहाराकडे दुर्लक्ष करत आहोत का? इतके तरुण, अल्लड मन, ज्याने अजून पूर्णपणे जगात पदार्पण देखील केले नसते, ते इतक्मया शुल्लक मोहाच्या आधीन कसे काय जात आहेत?
ह्याला बरेच पैलू कारणीभूत आहेत. मानवी मानसशास्त्र हे एक हिमनग आहे. वरून दिसताना जरी लहान दिसले तरी समुद्राच्या आत जाऊन त्याचा मूळ शोधायचा प्रयत्न केल्यावर त्याच्या खोलवर पोहोचणाऱया मुळाची जाणीव होते. माणूस हा सर्व श्रे÷ प्राणी असला तरी त्याचे मन तितकेच ठिसूळ आहे. माणसाने आपल्या मेंदूच्या जोरावर मृत्यूलादेखील मात दिली आहे. जगातील अनेक अशक्मय वाटणारे प्रश्न त्याने सोडवले आहेत. पण एकच गोष्ट आहे ज्याचावर तो अजूनही ताबा मिळवू शकला नाही आहे. ती गोष्ट म्हणजे त्याचे मन.
माणसाचे मन जेव्हा कमकुवत होते तेव्हा त्याचा स्वतःच्या भावनांवारील ताबा सुटतो. अशा वेळेला, जर परिस्थितीसुद्धा आश्वासक वाटली नाही, तेव्हा माणूस अशा बाह्य उत्तेजनाचे सहकार्य घेऊ लागतो. हा तात्पुरता शॉर्टकट त्याला प्रत्येक समस्येचा उपाय वाटू लागतो. पण त्याला तेव्हा हे लक्षात येत नाही की प्रत्येक शॉर्टकटची भविष्यातील किंमत त्या क्षणिक आनंदापेक्षा अधिक जास्त असते!
वाढत्या व्यसनांना सामाजिक दबावदेखील कारणीभूत आहे. या काळात माणसाची किंमत एक माणूस म्हणून नाही, तर त्याच्या समाजातील दर्जावरून ठरवली जाते. बरेचदा माणसं मित्र-मैत्रिणींच्या किंवा सामाजिक गटाच्या दबावाखाली अंमली पदार्थांचे सेवन करतात. कित्येकदा केवळ त्या समूहाचा भाग होण्यासाठी त्यांच्यावर अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी दबाव टाकला जातो.
माणूस सामाजिक दर्जा, प्रसिध्दी, आणि पैसा या तात्पुरत्या आणि बनावटी जगाच्या मोहात इतका अडकला आहे का की तो निसर्गाने दिलेल्या या अद्भुत शरीराचे आणि अस्तित्वाचे महत्त्व विसरू लागला आहे? ज्या माणसाने सामाजिक दर्जा आणि पैशासारख्या क्षणिक सुखांची निर्मिती केली, तिच आज त्याच्यावर राज्य करू लागली आहेत का असादेखील प्रश्न मनामध्ये येतो.
अजून एक खूप महत्त्वाचा पैलू या अंमली पदार्थांच्या प्रसारामागे आहे. भारतात कलेला विशेष महत्व आहे. भारत हा कलेचा आणि संस्कृतीचा खजिना मानला गेला आहे. त्यामुळे भारतीय जनतेसाठी चित्रपटातील नट-नटय़ा हे आदर्शच आहेत. कित्येक कलाकारांना भारतात देव, नायक नायिका मानले जाते व त्यांची मूर्ती करून पूजा केली जाते. भारतातील सर्वात मोठी सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड. बॉलिवूडमध्ये ज्या काळात जो सिनेमा गाजतो, त्यावर आधारित भारतीय समाज प्रभावाखाली राहतो. अशा वेळेला आवडत्या कलाकाराने जर पडद्यावर मादक पदार्थांचे सेवन केलेले दिसले, तर या भयानक गोष्टी सामान्य वाटू शकतात. प्रत्येक माणूस आपल्या आदर्शाच्या पावलावर पाऊल ठेवू बघत असतो. अशा वेळेला जर पडद्यावर बेकायदेशीर गोष्टी सहजपणे होताना दिसल्या तर त्यासंदर्भातली मनातली कायद्याची भीती कमी होऊ शकते.
सध्या बऱयाच अशा प्रसिद्ध कलाकारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बातम्या आपण ऐकतो आहोत. तरुण मुलं अंमली पदार्थांच्या जाळय़ात अडकलेली आपल्यासमोर येत आहेत. काही लोक त्यांच्या विरोधात बोलत आहेत तर काही त्यांचे समर्थन करत आहेत. या सगळय़ा ‘तू तू मैं मैं’ मध्ये मुख्य मुद्दा बाजूला राहतो आहे. कोणी व्यसने करावीत आणि कोणी नाही हा मुळात प्रश्नच उद्भवला नाही पाहिजे. गरीब असो वा श्रीमंत, व्यसन हे नुसतंच बेकायदेशीर नाही तर विनाशक आहे हे लक्षात घेतले पाहिजे. नुसते प्रसारमाध्यमांवर आपले मत मांडण्यापेक्षा आपल्या आजूबाजूच्या माणसांची सतर्कतेने काळजी घेणे गरजेचे आहे. कुठल्या कलाकाराला वा त्यांच्या कुटुंबीयांना अंमली पदार्थांच्या सेवनामुळे अटक केली तर सरकारला दोष देण्यात काय अर्थ आहे? शेवटी पडद्यावर भव्य आणि आलिशान दिसणारे हे कलाकारदेखील शेवटी माणूसच आहेत. तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाचे रक्षण करायचे असेल तर चुकीच्या वागणुकीचे समर्थन करण्यापेक्षा त्यांना त्यांच्या चुका सुधारायला योग्य ती मदत मिळवून द्या. हे लक्षात घ्या की, व्यसनी माणसाचा स्वतःवर ताबा नसतो. त्याला वाळीत टाकण्या किंवा बेदखल करण्यापेक्षा त्याला परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव करून देणे जास्त गरजेचे आहे.
कोणत्याही सामाजिक टेण्डला आंधळेपणाने स्वीकारण्यापेक्षा एक नागरिक आणि माणूस म्हणून जागरूक राहूनच समाजात वर्तन केले पाहिजे. आणि जर काही दिग्गज माणसं गैरवर्तन करून आपली सामाजिक जबाबदारी विसरत असतील तर ते आदर्श पात्र आहेत का याचादेखील विचार केला पाहिजे. योग्य आदर्श निवडा, जे आपला आणि जगाचा उद्धार करायला प्रेरित करतील, नाश नाही.
-श्राव्या माधव कुलकर्णी








