रांगेत थांबणाऱ्या अन् परिसरात वावरणाऱ्यांनाही लुटता येणार सुरेल संगीताचा आनंद
मंदिरात बसविलेल्या आयपी सिस्टीम व स्पीकरचे संभाजीराजेंच्या हस्ते उद्घाटन
केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा 80 लाखाचा निधी
प्रतिनिधी / कोल्हापूर
दर्शनाच्यानिमित्ताने करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात जाणाऱया भाविकांच्या कानी आता आयपी बेस पब्लिक अँड्रेस सिस्टिममधून भक्तीगीतांच्या संगीताची धून पडणार आहे. दर्शनाची आस धरून मंदिराबाहेरील रांगेत तासंतास थांबणाऱया भाविकांसह मंदिराच्या चारी बाजूला खरेदीसाठी वावरणाऱ्यांनाही सुरेल संगीताचा आनंद लुटता येणार आहे. शनिवारी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या आंतरारष्ट्रीय दर्जाच्या सिस्टीमचे उद्घाटन झाले. मंदिरातील गरूड मंडपात देवस्थान समितीने उद्घाटन समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी समितीच्या 2021 सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही संभाजीराजे यांच्या हस्ते झाले.
देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, खासदार संभाजीराजे यांनी केंद्राच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या माध्यमातून अंबाबाई मंदिरासाठी आयपी सिस्टीम मंजूर केली आहे. तिची 1 कोटी 48 लाख 29 हजार 991 रूपये इतकी किंमत आहे. देवस्थान समितीला 80 लाख रूपये मिळाले आहेत. त्यातून खरेदी केलेल्या स्पीकरपैकी 16 मंदिराच्या अंतरंगात तर 26 मंदिराच्या बाहेर लावले आहेत. आधुनिक आयपी सिस्टीम बसविलेले अंबाबाई मंदिर हे राज्यातील पहिले मंदिर आहे.
कोल्हापूरातील हेरीटेज ठिकाणांना गतवैभव मिळवून देण्यासाठी अभ्यासकांची टिम बांधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून संभाजीराजे म्हणाले, भविष्यात देवस्थान समितीने जर आपल्या अखत्यारितील मंदिरांचे नुतणीकरण करण्याचे ठरविले तर त्यासाठी पुरातन खात्याची सगळी मदत मिळवून देण्यासाठी कटीबद्ध राहिन. समितीचे सचिव विजय पोवार यांनी सिस्टीमची माहिती सांगितली. यानंतर
संभाजीराजे यांच्यासह सिस्टीम बसविण्यासाठी परिश्रम घेतलेले देवस्थान समिती कर्मचारी राहूल जगताप, अभिजित पाटील यांच्यासह नवीन हालगेकर, एडवर्ड डिसोझा, शेखर निरगुडकर यांचा सत्कार केला. यावेळी समिती कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, राजाराम गरुड, मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव, अभियंता सुदेश देशपांडे यांच्यासह आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर उपस्थित होत्या.
जुना राजवाडा, भवानी मंडपाचे रूपडे पालटणार
1857 च्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या जुना राजवाडा व तुळजा भवानी मंदिरासमोरील भवानी मंडपाचे रूपडे पालटून टाकण्याचे पाऊल उचलले आहे. आता त्यासाठी काय काय करता येईल, निधी किती लागेल याचा गांभिर्याने विचार सुरू असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.









