सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत भाविकांना घेता येणार दर्शन : पूर्वी रात्री 9 वाजेपर्यंत होती वेळ : देवस्थान समितीचा निर्णय
प्रतिनिधी / कोल्हापूर
करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरासह शहरातील इतर मंदिरांच्या दर्शन वेळेत तीन तासांनी कपात करण्यात आली आहे. याआधी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यत भाविकांना दर्शन घेण्याची मुभा होती. त्यामध्ये आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. शुक्रवार 19 मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार यांनी दिली.
राज्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेची भीती व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोनाच्या नियमावलीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी राज्य सरकारच्या निर्देनानुसार सर्व धर्माच्या प्रमुखांची बैठक घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रार्थनास्थळासंदर्भात खबरदारी घेण्याबरोबर नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी चर्चा केली होती. या बैठकीनंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने तातडीने पावले उचलली आहेत.
अंबाबाई मंदिरासह शहरातील मंदिरांच्या दर्शन वेळेत कपात
देवस्थान समितीच्या अख्यारित करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरासह शहरातील ओढÎावरील गणपती अर्थात सिद्धीविनायकाचे मंदिर, आझाद चौकातील दत्तभिक्षालिंग देवस्थान, महाव्दार रोडवरील बिनखांबी गणेश मंदिर, बागल चौकातील पंचमुखी मंदिर, त्र्यंबोली देवस्थान, टेंबलाईवाडी, कात्यायनी देवी, बालिंगा आदी मंदिरातील दर्शन वेळेत कपात करण्यात आली आहे. या मंदिरात सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर मंदिर बंद करण्यात येणार आहे, असे देवस्थान समितीने एका पत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या नियमांचे पालन करा
मंदिरात दर्शनासाठी येणाऱया भाविकांनी मास्क वापरणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य आहे. दर्शन रांगेत सुरक्षित अंतर ठेवून दर्शन घ्यावे, मंदिराच्या आवारात विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.