बंद दरम्यानही भाविकांची वर्दळ, दर्शन रांगेत शिस्तबद्धता
प्रतिनिधी/कोल्हापूर
आई अंबाबाईच्या दर्शनासाठी सहाव्या माळेदिवशी सोमवारी भाविकांमध्ये उत्साह दिसून आला. ऑनलाईन बुकिंग केलेल्या भाविकांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांपासून रांगेत उभे राहून शिस्तबद्ध पद्धतीने देवीचे दर्शन घेतले. मुखदर्शनालाही महाद्वार येथेही भाविकांची गर्दी होती. उत्तरप्रदेशमधील लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने बंदचे आवाहन केले होते. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंददरम्यान, भाविकांनी भक्तिभावाने अंबाबाईच्या चरणी माथा टेकला.
महाविकास आघाडीच्या बंद रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरुवात होणार होती. तसेच तिथेच ई-पास तपासणी कक्ष असल्यामुळे भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता पोलीस, वाहतूक पोलीस आणि देवस्थान समितीने घेतली होती. गुजरीत जाणाऱया स्थानिक व्यापाऱयांना पास दाखवल्यानंतर सोडले जात होते. भाऊसिंगजी रोडवर दोन्ही बाजूला फेरीवाल्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यांच्याकडून स्थानिकांसह परगावचे भाविक वस्तूंची खरेदी करत होते. भवानी मंडपातही असेच चित्र हेते. मात्र दुपारपर्यंत महाद्वार रोडवर बिनखांबी गणेश मंदिरापासून महाद्वारपर्यंत दोन्ही बाजूकडील काही दुकाने बंद तर काही उघडी होती. महाद्वार येथेही मुखदर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
होती.
शिवाजी पुतळ्यापासून भवानी मंडपातील दर्शन रांगेत भाविकांसाठी मॅट टाकले आहे. त्यामुळे भाविकांच्या पायांना उन्हाचे चटके बसत नाहीत. शिवाय मंडपातील रांगेत पत्र्याचे शेड टाकल्यामुळे भाविकांचे ऊन-पावसापासून संरक्षण होत असल्यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.