नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण निर्णय : रविवारी मोफत अॅपची लिंक जाहीर
संग्राम काटकर/कोल्हापूर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेली राज्यातील मंदिरे नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला अर्थात 7 ऑक्टोबरला खुली होत आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिरही खुले होणार असून ऑनलाईन बुकींग केल्यानंतरच भाविकांना दर्शन घेता येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने नवरात्रोत्सवात दर्शनाला होणारी भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी ऑनलाईन बुकींगचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यासाठी मोफत अॅपचीही सुविधा दिली असून रविवारी या संदर्भात देवस्थान समिती माहिती व लिंकही प्रसिद्ध करणार आहे.
करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर कोरोनामुळे गेल्या पावणेदोन वर्षात पाच महिन्यांचा अपवाद वगळता भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. येत्या 7 ऑक्टोबरला राज्यातील इतर मंदिरांप्रमाणे अंबाबाई मंदिरही भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या नियमानुसार मंदिर खुले करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने कार्यवाही सुरू केली आहे. 7 ऑक्टोबरला नवरात्रोत्सव सुरू होत आहे. या उत्सव सोहळÎात दर्शनासाठी स्थानिक भाविकांबरोबरच राज्यातील व परराज्यातील भाविकांची प्रचंड गर्दी होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे देवस्थान समितीने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑनलाईन बुकींग केल्यानंतरच भाविकांना दर्शन घेता येईल, असा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
ऍपची निर्मिती, बुकींग केल्यानंतरच दर्शन
भाविकांना दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करता यावे, यासाठी देवस्थान समितीने एका ऍपची निर्मिती केली आहे. नवरात्रोत्सव काळात हे ऍप पूर्णपणे मोफत असणार आहे. भविष्यात ते सशुल्क होऊ शकते. ऍपवर नोंदणी केलेल्या भाविकांना दर्शनाची तारीख, दिवस आणि वेळ मिळणार आहे. त्यानुसार दर्शनाला येणाऱया भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. एखाद्या भाविकांला सकाळी 8 ते 9 वाजताची वेळ मिळाली तर त्यावेळेतच त्याला दर्शन घेता येणार आहे. वेळेची मुदत संपल्यानंतर दर्शन मिळणार नाही. दर्शनाची संधी हुकल्यास संबंधित भाविकाला पुन्हा ऑनलाईन बुकीग करावे लागणार आहे.
तासाला 750 भाविकांना दर्शन, ऍपची चाचणी सुरू
प्रत्यक्ष मंदिरात दर 5 सेकंदाला 1 भाविक दर्शन घेईल, त्यानुसार एका तासात 750 भाविक दर्शन घेतील, असे गृहित धरून देवस्थान समितीने नियोजन केले आहे. ऑनलाईन बुकींगसाठी जे ऍप तयार केले आहे, त्याची ट्रायल (चाचणी) नियोजनानुसार घेतली जात आहे. ट्रायलनंतर ऍपची लिंक भाविकांना देण्यात येणार आहे. नवरात्रोत्सव काळात ऍप मोफत असेल, नजीकच्या काळात ते सशुल्क होऊ शकते, रविवारी 3 ऑक्टोबरला ऍपची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे देवस्थान समितीच्या वतीने सांगण्यात आले.
पूर्व दरवाज्यातून इन, दक्षिण दरवाजातून आऊट
नवरात्रोत्सवात ऑनलाईन बुकींग करून येणाऱया भाविकांना सरलष्कर भवन जवळील पूर्व दरवाजातून प्रवेश मिळणार आहे, तर दर्शनानंतर विद्यापीठ हायस्कूलजवळील दक्षिण दरवाजातून बाहेर पडता येणार आहे. महाव्दार बंद राहणार असून तेथून मुख दर्शन घेता येणार आहे. घाटी दरवाजा आपत्कालिन घटनेवेळीच खुला राहणार आहे. मंदिराजवळील चप्पल स्टँड आता मेन राजाराम हायस्कूल जवळ हलविण्यात आली आहेत. तसेच गाडगे महाराज पुतळा ते अलंकार हॉटेलपर्यंत दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे.
10 ते 65 वयोगटातील भाविकांना प्रवेश
10 ते 65 वयोगटातील भाविकांना अंबाबाईच्या दर्शनाला प्रवेश मिळणार आहे. त्याचबरोबर गर्भवती, आजारी व्यक्तींना प्रवेश मिळणार नाही. कोरोनाच्या संदर्भातील नियमांचे दर्शनकाळात पालन करण्यात येणार आहे.