वृत्तसंस्था/ मुंबई :
फेसबुकबरोबरच्या व्यवहाराने मुकेश अंबांनी यांच्या संपत्तीत वाढ झाली असून त्यांनी आता अलीबाबाचे संस्थापक जॅक मा यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंमध्ये अग्रस्थान मिळवले आहे.
मुकेश अंबांनी यांची कंपनी रिलायन्स जिओ आणि मार्क झुकेरबर्ग यांची कंपनी फेसबुक यांच्या एकत्रित येण्याने उद्योगजगतात एका बाजूला मोठे आश्चर्य तर दुसरीकडे काहीशा दबावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये बुधवारी व्यवहार झाला आहे. यात फेसबुकने जिओमध्ये तब्बल 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची संपत्ती 4 अब्ज डॉलरने वाढून 49 अब्ज डॉलरच्या घरात पोहोचली आहे. या वाढीमुळे अंबानी यांनी अलीबाबा उद्योगाचे संस्थापक जॅक मा यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंतांमध्ये सर्वोच्च स्थान पटकावले आहे.
या स्पर्धेत जॅक मा यांच्यापेक्षा फक्त 3 अब्ज डॉलरने संपत्ती जादाची अंबानी यांच्याकडे आहे. ब्लॅमबर्ग यांच्या आकडेवारीनुसार 21 एप्रिलपर्यंत अंबानी यांची संपत्ती 14 अब्ज डॉलरने घसरली होती. त्याच दिवशी जॅक मा यांच्या संपत्तीत 1 अब्ज डॉलरने घसरण नेंदवण्यात आली आहे.
समभागात तेजीची उसळी
बुधवारी झालेल्या फेसबुकसोबतच्या व्यवहारानंतर बातमीने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात मोठी तेजीची उसळी पहावयास मिळाली होती. जवळपास ही तेजी 11 टक्क्मयांनी वधारुन 1375 रुपयांची उंची गाठत होती. बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर रिलायन्सचे समभाग 9.83 टक्क्मयांनी वधारुन 1359 रुपयांवर पोहोचले होते. त्यामुळे बुधवारी रिलायन्सच्या बाजारमूल्यात 90 हजार कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.









