दिल्ली/प्रतिनिधी
अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांनी बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मोठा धक्का दिलाय. अदानींनी अंबानींना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत होण्याचा बहुमान पटकावला आहे. आता अदानी हे अंबानींपेक्षा श्रीमंत झाले आहेत. विशेष म्हणजे केवळ भारतात नाही तर अदानी हे आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये अंबानींच्या पहिल्या स्थानी पोहचलेत.
गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या संपत्तीची कायमच तुलना केली जाते. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार एप्रिल २०२० पासून अदानींच्या संपत्तीमध्ये मोठ्याप्रमाणामध्ये वाढ होत आहे. १८ मार्च रोजी अदानींची संपत्ती ४.९१ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी होती. मागील २० महिन्यामध्ये अदानींची संपत्ती १ हजार ८०८ टक्क्यांनी वाढलीय. म्हणजेच अदानींची संपत्ती ४.९१ बिलियन डॉलरवरुन ८३.८९ बिलियन डॉलरवर गेलीय. याच कालावधीमध्ये मुकेश अंबानींची संपत्ती २५० टक्क्यांनी म्हणजेच ५४.७ बिलियनने वाढलीय.
दरम्यान, बाजार तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदार अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स कमी कालावधीत २०-२५ टक्क्यांनी वाढू शकतात, त्यामुळे या शेअर्समध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. गेल्या १८ महिन्यांत या शेअर्सची वाटचाल खूप चांगली राहिली आहे. जून-जुलै २०२१ पासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे, पण अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये मोठी रिकव्हरी दिसून आली आहे.









