पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हा फलंदाजीसोबत बोलंदाजीच्या स्तरावरही अंधाधुंद असल्याचेच त्याच्या विधानांवरून दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीका वा काश्मीर संघाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न असो. यामागे आफ्रिदीचा निश्चित काहीतरी हेतू असणार, हे निश्चित आहे. भारत आणि पाकिस्तान हे परस्परांचे शेजारी असले, तरी या दोन राष्ट्रांमधील संबंध कधीही सौहार्दाचे राहिलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आजवर 1947, 1965, 1971 अशा तिन्ही युद्धात भारताकडून पाकने सपाटून मार खाल्ला. शिवाय कारगिलची लढाई, वेळोवळी झालेली ऑपरेशन्स व सर्जिकल स्ट्राईकच्या आघाडीवरही भारताने कायम शेजाऱयाला मात दिली. या दोन देशांमधील ही खुन्नस क्रिकेटच्या मैदानावरदेखील सातत्याने क्रीडारसिकांनी अनुभवली असेल. अब्दुल कादीर-सचिन तेंडुलकर, आमीर सोहेल-व्यंकटेश प्रसाद यांच्यातील जुगलबंदी कोण विसरेल? जावेद मियाँदादच्या माकडउडय़ाही अशाच संस्मरणीय. पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान हे आज या देशाचे नेतृत्व करीत आहेत. राजकारणाचे दार ठोठावताना इम्रान यांनीही भारताविरोधी विधाने करण्यातच धन्यता मानली. भारताविरोधात भूमिका घ्यायची आणि आपली खुंटी बळकट करायची, ही येथील राजकारण्यांची जुनी नीतीच आहे. आज लोकांना मदत करण्याच्या नावाखाली समाजकारण करणाऱया आफ्रिदीचा हेतूही कदाचित असाच असावा. सध्या हे महाशय सामाजिक कार्यात व्यस्त आहेत. त्याच्या समाजकार्याची दखल घेऊन अनेक भारतीय क्रिकेटपटू व रसिकही त्याला पाठबळ देत आले आहेत. संकुचित विचारांच्या पलीकडे जाऊन संवेदनशील वा विधायक कामांच्या मागे उभे राहणे, हे भारतीयत्वाचे मूळ लक्षण होय. युवी, भज्जीने सुरुवातीच्या सत्रात त्याचे कौतुक करणे, हा त्याचाच परिपाक. परंतु, तोच आफ्रिदी काश्मीरविषयी सतत उलटसुलट विधाने करतो, तेव्हा त्याच्या मनातील काळेबेरे लपून राहत नाही. पाकिस्तान सुपर लीगमध्ये काश्मीर संघाचा समावेश करावा. माझ्या अखेरच्या वर्षात मला या संघाचे नेतृत्व करायचे आहे, ही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला त्याने केलेली विनंती हे विधान वरकरणी क्रीडाविषयक वाटत असले, तरी ते राजकीयच आहे, हे समजून घ्यायला हवे. याद्वारे भारताला डिवचण्याचा त्याचा प्रयत्न स्पष्टपणे अधोरेखित येतो. मोदी वा इम्रान यांनी परस्परांवर टीका करणे वा दूषणे देणे वेगळे. परंतु, आफ्रिदाने मोदी यांच्या डोक्यात कोरोनापेक्षा भयंकर व्हायरस आहे. मोदी सरकार काश्मिरींवर अत्याचार करीत असल्याचे आरोप करणे, हेदेखील स्वत:चे महत्त्व वाढविण्याचा प्रकार म्हणता येईल. यातून स्वत:करिता राजकीय भूमी तयार करण्याचा आफ्रिदीचा मनसुबा असू शकतो. वास्तविक चार वर्षांपूर्वी याच आफ्रिदीने पाकिस्तानपेक्षा भारतीय चाहत्यांकडून अधिक प्रेम मिळते, असे वक्तव्य केले होते. त्यावरून टीकेची झोड उठल्यानंतर सकारात्मक संदेश देण्याचा आपला हेतू असल्याचे त्याने म्हटले. तोच आफ्रिदी त्यानंतर काश्मीरचे तुणतुणे लावून धरतो, यातच सगळे आले. त्याचे ‘गेम चेंजर’ नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्यात काश्मीर ना भारताचे ना पाकिस्तानचे. ते काश्मिरी जनतेचे आहे, म्हणूनच काश्मीरला स्वतंत्र राहू द्या, असेही तो म्हणतो. त्याला काश्मीरमध्ये नेतृत्व प्रस्थापित करायचे आहे का, असा प्रश्न त्यातून उपस्थित होतो. दृष्टिकोन खरोखरच शुद्ध असेल, एखाद्या प्रांतातील, भागातील लोकांविषयी आत्मियता, प्रेम असेल. त्यांच्यासाठी काहीतरी विधायक स्वरुपात करण्याची इच्छा असेल, तर कृतिशील माणूस नक्कीच काहीतरी करू शकतो. त्यासाठी राजकारण करण्याची कोणतीही गरज नाही. खरे तर आजघडीला कोरोनाने अवघे जग ठप्प झाले आहे. करोडो लोक बेरोजगार झाले असून, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या जागतिक संकटाचा मुकाबला सर्वांनी आपापले मतभेद विसरून करायला हवा. परंतु, अशा संकटसमयीही सीमेवर कारवाया वा चकमकी होणे, म्हणजे कशापासूनच कुठला बोध न घेण्याची नापाक परंपराच म्हणायला हवी. आफ्रिदीच्या टीकाटिप्पण्याही अशाच. या काळात दोन शेजाऱयांमधील संबंध कसे सुरळीत होतील, त्यांच्यातील वितुष्ट संपून संवाद कसा घडविता येईल, त्यातून कोरोनावर मात कशी करता येईल, याविषयी त्याने ऊहापोह केला असता, तर ते ‘गेम चेंजर’ ठरले असते. तसा आफ्रिदी धसमुसळा, स्वैर. 398 एकदिवसीय सामने खेळलेला हा क्रिकेटर कधीही भरवशाचा वाटला नाही. पाकिस्तानच्या संघाला इम्रान, सलीम मलिक, इंझमाम, इजाज अहमद, युनुस खान, युसूफ योहाना अशी दमदार परंपरा. तथापि, स्फोटक फलंदाज म्हणून संघात आलेल्या आफ्रिदीला सातत्य राखता आले नाही. तंत्रशुद्धता व टायमिंगचा अभाव ही त्याची उणे बाजू. त्यामुळे मोठी मजल मारता न आलेल्या आफ्रिदीची सरासरी 23 पर्यंतच सीमित राहिली. तरीदेखील आफ्रिदी बाद होईंपर्यंत अनेकांच्या जीवात जीव नसायचा, तो त्याच्या अंधाधुंद फलंदाजीने. कोणताही अभ्यास वा विचार न करता नुसती फटकेबाजी करण्याची ही सवय क्रिकेटमध्ये कशीबशी खपून गेली असली, तरी वास्तवात ही असली आंधळी कोशिंबीर उपयोगाची नाही, हे त्याने ध्यानात घ्यावे. अर्थात गोलंदाज म्हणून आफ्रिदी अधिक लक्षात राहतो. गोलंदाजीतील तो शांतपणा, प्रगल्भता, अचूक टप्पा अफलातूनच. आज तो भरकटला आहे. स्वैर वा दिशाहीन झाला आहे. म्हणूनच त्याने पुन्हा याच टप्प्यावर येण्याची आवश्यकता आहे. आपला असो वा बाहेर देशीचा. भारतीय प्रत्येकाच्या खेळावर प्रेम करतात. वासिम अक्रमचा यॉर्कर, वकार युसूनची भेदकता वा शोएबच्या वेगावरही भारतीयांनी एकेकाळी प्रेम केले. आफ्रिदीचाही भारतात चाहता वर्ग होता, अजूनही असेल. तथापि, नस्त्या उठाठेवी करण्यापेक्षा त्याने आपल्यातील क्रिकेटरमधील माणूसपणाचे दर्शन घडवावे. फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजूंना मदत करावी. त्यातूनच खऱया अर्थाने ‘गेम चेंज’ होईल.
Previous Articleअरे लॉकडाऊन, लॉकडाऊन
Next Article भुदरगडात सहा जणांना कोरोनाची लागण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








