प्रतिनिधी/ कराड
वाघ आणि बिबटय़ाची तस्करीप्रकरणात कराड येथील दोघांना वनविभागाने सोमवारी सापळा रचून पकडले. गळ्यात नख्यांचे लॉकेट अडकवून ग्राहकांच्या शोधात असणाऱ्या संशयितांच्या साखळीत आणखी काहींचा सहभाग समोर येण्याची शक्यता वनविभागाकडून वर्तवली जात आहे. वाघनख्या किंवा बिबट्याच्या नख्यांचे लॉकेट किंवा त्या जवळ बाळगण्याच्या अंधश्रद्धेतूनच हा संशयित तस्करीत सक्रीय झाले असावेत, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
कराड येथील दिनेश बाबूलालजी रावल (वय 38, रा. सोमवार पेठ, कराड) व अनुप अरुण रेवणकर (वय 36, रा. रविवार पेठ, कराड) या दोघांना 16 ऑगस्ट रोजी वन्यप्राण्यांच्या नख्यांच्या तस्करीप्रकरणी वनविभागाने अटक केली. या दोघांनी किती तरी जणांना नख्या विकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या दृष्टीने वनविभाग चौकशी करत आहे. संशयितांकडून आतापर्यंत एकूण 20 नख्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यातील काही वाघ व बिबट्याच्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. मात्र नख्या नेमक्या कोणत्या प्राण्यांच्या आहेत, याची तपासणी सुरू आहे. नख्यांचे लॉकेट गळ्यात अडकवणे ही एक फॅशन आणि दुसरी अंधश्रद्धा आहे. नख्यांमुळे बरेच काही बदल होऊ शकतात, ही अंधश्रद्धा असल्यानेच हा तस्करीचा उद्योग वाढला असावा, अशी शक्यता वनविभागाकडून वर्तवली जात आहे. मात्र अद्यापही वनविभागाकडून छापासत्र व चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील नेमका मास्टरमाइंड कोण, हे तपासण्यातही वनविभागाची यंत्रणा गुंतली आहे.









