गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन – सर्व तरुण-तरुणींनी एकदा अवश्य जावे
वृत्तसंस्था/ पोर्ट ब्लेयर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवसीय दौऱयानिमित्त शुक्रवारी अंदमान आणि निकोबार येथे पोहोचले होते. या दौऱयादरम्यान शाह यांनी शनिवारी नेताजी सुभाष चंद्र बोस बेटावर जात तेथे विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला आहे. अंदमान-निकोबार बेटसमूह स्वातंत्र्याचे तीर्थक्षेत्र आहे. सर्व तरुण-तरुणींना एकदा तरी अंदमान-निकोबारचा प्रवास करण्याचे आवाहन करत असल्याचे शाह यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपराज्यपाल ऍडमिरल डी.के. जोशी (निवृत्त) उपस्थित होते.
यंदा आमही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करत आहोत. नेताजींचे जीवन पाहिल्यास त्यांच्यासोबत अन्याय झाल्याचे आम्हाला वाटू लागते. नेताजींना त्यांच्या कर्तृत्वानुसार इतिहासात स्थान देण्यात आलेले नाही. कित्येक वर्षापर्यंत अनेक नेत्यांकडून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण बोस यांना इतिहासात योग्य स्थान देण्याची वेळ आता आली आहे. स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱयांना इतिहासात स्थान मिळायला हवे. याचमुळे आम्ही या बेटाला नेताजींचे नाव दिल्याचे शाह म्हणाले.
तत्पूर्वी अमित शाह यांनी शुक्रवारी पोर्ट ब्लेयर सेल्युलर तुरुंगाचा दौरा करत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना श्रद्धांजली वाहिली होती. इंग्रजांकडून तयार करण्यात आलेला सेल्युलर तुरुंग देशभरातील लोकांसाठी सर्वात मोठे तीर्थक्षेत्र आहे. स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्याने सेल्युलर तुरुंग हे तीर्थांमध्ये महातीर्थ असल्याचे सावरकर म्हणायचे असे विधान शाह यांनी केले आहे.









