ऑनलाईन टीम / मुंबई :
अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारने शुक्रवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.
व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात येत आहेत या आशयाचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील दिले आहे. उध्दव ठाकरे यांनी म्हटले की, कोणतीही परीक्षा घेण्यासाठी सध्याची परिस्थिती अनुकूल नाही आहे. त्यामुळे विद्यापीठांनी ठरवलेल्या निकषांनुसार विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यासंदर्भात या अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय शिखर संस्थांना सूचना देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे पत्राद्वारे केली आहे. यामध्ये ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल कौन्सिल फॉर टिचर्स एज्युकेशन या संस्थांचा समावेश आहे. राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर या संस्थांनी शिक्कामोर्तब करावं आणि तसे आपल्या अखत्यारीतील विद्यापीठांना कळवावं, अशी विनंतीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानाना लिहिलेल्या पत्रात केली आहे.









