आर्थिक समभागात घसरण – सेन्सेक्समध्ये 66 अंकांनी घट
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात पुन्हा घसरणीचे सत्र राहिले आहे. यामध्ये दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स 66 अंकांनी प्रभावीत झाला आहे. जागतिक बाजार नकारात्मक स्थितीत समाप्त झाले असून याच्या अगोदर आर्थिक आणि धातू या क्षेत्रातील समभागातील विक्रीच्या कारणास्तव नरमाईचा सूर बाजारात राहिला होता.
दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स 66.23 अंकांनी घसरुन निर्देशांक 52,586.84 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 15.40 अंकांनी घसरुन निर्देशांक 15,763.05 वर बंद झाला आहे.
ट्रेडिंगच्या दरम्यान बाजारात जास्तीत जास्त नकारात्मक स्थिती निर्माण झालेली दिसली आहे. यामध्ये जागतिक कल काहीसा प्रभावीत झाल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला असल्याचे दिसून आले आहे. जागतिक वातावरणात प्रामुख्याने युरोपीय बाजारात नकारात्मक कल निर्माण झाल्याने अंतिम क्षणी विक्रीत दबावाची स्थिती राहिली होती.
दिग्गज कंपन्यांचा विचार करता शुक्रवारी बीएसई सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्सचे समभाग सर्वाधिक 2.5 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. यासह भारतीय स्टेट बँक, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, एशियन पेन्ट्स आणि ऍक्सिस बँक यांच्या समभागात प्रामुख्याने घसरण राहिली होती. दुसऱया बाजूला सन फार्मा, टेक महिंद्रा, पॉवरग्रिड कॉर्प, बजाज ऑटो, एनटीपीसी आणि एचसीएल टेक यांच्यासह अन्य कंपन्यांचे समभाग नफ्यात राहिले आहेत.
जागतिक बाजारात शुक्रवारी सुस्ती दिसून आली. जागतिक पातळीवरील बाजारांपैकी शांघाय, हाँगकाँग, टोकीओ आणि सिओल हे बाजार प्रामुख्याने नुकसानीसह बंद झाले आहेत. युरोपातील प्रमुख बाजारांतील ट्रेडिंगमध्ये घसरणीचा कल राहिला होता. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांनी कमकुवत होत 74.42 वर बंद झाला आहे.








