100 वर्षांपूर्वी भारतीय वैज्ञानिकाने केली होती भविष्यवाणी
वृत्तसंस्था/ पॅरिस
वैज्ञानिकांना पहिल्यांदाच अंतराळात पदार्थाच्या पाचव्या अवस्थेचे (फिफ्थ स्टेट ऑफ द मॅटर) पुरावे मिळाले आहेत. या संशोधनामुळे ब्रह्मांडातील गूढ उकलण्यास मदत होऊ शकते तसेच त्याच्या उत्पत्तीचाही शोध लावला जाऊ शकतो, असे वैज्ञानिकांचे मानणे आहे. भारतीय वैज्ञानिक सत्येंद्र नाथ बोस आणि अल्बर्ट आईनस्टाईन यांनी पदार्थाच्या या अवस्थेसंबंधी 100 वर्षांपूर्वी म्हणजेच 1920 मध्ये नमूद केले होते. याच कारणामुळे याला ‘बोस-आईनस्टाइन कंडेनसेट्स (बीईसी)’ असेही म्हटले जाते. हा प्रयोग आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) करण्यात आला आहे.
कुठल्याही घटकाच्या अणूंना परम शून्यापर्यंत (झिरो डिग्री केल्विन किंवा उणे 273.15 अंश सेल्सिअस) पर्यंत थंड केल्यास पदार्थाची ही अवस्था निर्माण होते. या स्थितीमुळे त्या तत्वाचे सर्व अणू मिळून एक होतात म्हणजेच ‘सुपर ऍटम’ निर्माण होतो. यालाच पदार्थाची पाचवी अवस्था म्हटले जाते. कुठल्याही पदार्थात त्याचे अणू वेगवेगळी गती निर्माण करतात, परंतु पदार्थाच्या पाचव्या अवस्थेत एकच मोठा अणू असतो आणि त्यात तरंग निर्माण होत असतात.
बीईसीचे पृथ्वीवरसंशोधन अशक्य
बीईसी अत्यंत संवेदनशील आहे, याच्या अवस्थेत किंचित फेरफार केल्यास ते तप्त होण्याची भीती असते. ते नेहमीच परम शून्य तापमानावर असतात. किंचित उष्णता वाढल्यास पदार्थाची पाचवी स्थिती संपुष्टात येते. याच कारणामुळे पृथ्वीवर याचे अध्ययन जवळपास अशक्य असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले आहे. बीईसीत अंतराळात रहस्यमय काळोख्या ऊर्जेची माहिती माहिती लपलेली आहे. ब्रह्मांडाच्या फैलावामागे हीच काळोखी ऊर्जा कारणीभूत असल्याचे वैज्ञानिक मानतात. हे संशोधन नेचर जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
आयएसएसवर प्रयोग
आयएसएसमध्ये पदार्थाची पाचवी स्थिती निर्माण करणे सोपे काम नव्हते. बोसोन (असे अणू ज्यात प्रोटान आणि इलेक्ट्रॉन समान असतील) ला लेझर तंत्रज्ञानाद्वारे परमशून्य तापमानापर्यंत थंड केले जाते. अणूंचा वेग मंद होऊ लागल्यावर ते थंड होऊ लागतात. वैज्ञानिकांनी रुबीडियम धातूने बीईसी निर्माण केला आहे.
पदार्थाच्या चार अवस्था
पदार्थाच्या 4 अवस्था असतात. ठोस, द्रव, वायू आणि प्लाझ्मा यांचा यात समावेश आहे. प्लाझ्मा वायूसदृश अवस्थाच असते. तारे प्लाझ्माद्वारेच निर्माण झाल्याचे मानले जाते. ब्रह्मांडात 96 टक्के प्लाझ्माच आहे.









