प्रतिनिधी/ बेळगाव
अंतरजल वाढविण्यात बेळगाव जिल्हा संपूर्ण राज्यात आदर्श ठरावा या दिशेने जिल्हा पंचायतच्या अधिकाऱयांनी अंतरजल चैतन्य योजनेची अंमलबजावणी करावी, अशी सूचना राज्याचे ग्रामीण विकास आणि पंचायतराज खात्याचे मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी अधिकारी वर्गास केली आहे. मंगळवारी येथील सर्किट हाऊस येथे अंतरजल चैतन्य आणि नरेगा कामाच्या विकास आढावा बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी मंत्री के. एस. ईश्वरप्पा होते. बेळगाव जिल्हय़ातील पानतळ आणि ऊस उत्पादन अधिक असणाऱया तालुक्यांना वगळून अन्य ठिकाणी आंतरजल चैतन्य वाढविण्याकडे प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
नरेगा योजना आणि शेतकरी निर्माणासंबंधित निर्धारित केलेले उद्धिष्ट गाठण्यासाठी उपाययोजना कराव्या. जिल्हाधिकाऱयांसमोर समन्वय साधून ओला व सुका कचरा संकलन डेपो निर्माणासाठी आवश्यक जागा मिळवावी असेही मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी सांगितले. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी नरेगा अंमलबजावणीबाबत माहिती दिली. आतापर्यंत बेळगाव जिल्हय़ात 42 टक्के उद्धिष्ट गाठण्यात आले. लॉकडाऊनमुळे काही प्रमाणात परिणाम झाला असून यापुढे कामाची गती वाढविण्याता आल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, विधान परिषदेचे मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ, जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मणहळ्ळी, जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, उपाध्यक्ष अरुण कटांबळे आदी उपस्थित होते.









