परवा माझ्या मैत्रीणीने विचारले, ‘कधीतरी उदास वाटणं, रडू येणं हे नॉर्मल आहे ना गं? की आपण कायमच प्रेश असायला हवे…कधीतरी भीती वाटते गं. सारखे डिप्रेशन वगैरे शब्द कानावर येत असतात ना! मानसिक आरोग्याला धोका निर्माण होण्याकडे आपली वाटचाल होते आहे हे ओळखायचे कसे? त्यासाठी काय करायला हवे?’
खरंतर जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक आरोग्याची व्याख्या ठरवताना त्याचे तीन निकष निश्चित केले आहेत. यापैकी कोणताही एक निकष कमी असतो त्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही असे म्हणतात. त्यातील पहिला निकष म्हणजे वास्तवाची सुसंगत जाणीव होणे हा आहे. अशी जाणीव ज्यावेळी असते त्यावेळी त्या व्यक्तीला आपले नाव, गाव, आपण काय करतो, कुठे राहतो याचे भान असते. ती व्यक्ती जे पाहते, ऐकते, अनुभवते त्याचा तिने लावलेला अर्थ सुसंगत असतो. स्वास्थ्याचा दुसरा निकष म्हणजे परिस्थितीतील तणावांना सामोरे जाताना ती व्यक्ती स्वतःला उत्साही आणि सक्रिय ठेवू शकते. तिसरा निकष अन्य व्यक्तींशी संवाद साधून नाते जोडणे.
सध्याच्या काळात मानसिक आरोग्याचे प्रश्न ऐरणीवर आहेत. वेगवेगळय़ा वयोगटांमध्ये उद्भवणाऱया विविध समस्या आपण पाहतोच आहोत. विविध मानसिक आजारांमधे होणारी लक्षणीय वाढ, आत्महत्यांचे वाढते प्रमाण, डिप्रेशनच्या केसेस यात होणारी वाढ पाहता मानसिक आणि भावनिक आरोग्याच्यादृष्टीने सजग असणे फार गरजेचे आहे. त्यादृष्टीने सुरुवातीला विचारलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि त्यावर चर्चा होणे आवश्यकच आहे.
खरंतर मागच्या एका लेखात उल्लेख केल्याप्रमाणे शारीरिक सुदृढतेबाबत बोलायचे तर वजन, उंची, काम करण्याची क्षमता अशा मोजमापांच्या आधारे आपण शारीरिक आरोग्य मोजत असतो. तसेच मानसिक आरोग्याच्या दृष्टीने व्यक्तीच्या स्वभावाच्या विविध पैलुंचे निरीक्षण आवश्यक असते. शारीरिक सुदृढता म्हटली की आपल्या डोळय़ासमोर पटकन् हनुमान वा भीमासारखी बलवान शरीरयष्टी येते परंतु निरोगी वा सुदृढ असण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला तेवढे बलवान असण्याची गरज असते का? तर नाही. तसेच निरोगी मन वा सुदृढ मन याचा अर्थ एखाद्या व्यक्तीमध्ये, स्वभावामध्ये एकही दोष नसणे, ती व्यक्ती सर्वगुणसंपन्न असणे असा नाही. व्यक्तीमध्ये त्रुटी, दोष असतातच परंतु त्याची योग्य जाणीव आणि सुधारणेच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न ही गोष्ट मात्र सुदृढ मानसिक आरोग्याच्या दिशेने नेणारी आहे. तसेच जीवनाची वाटचाल करत असताना कधी उत्साह वाटणे, काहीवेळा निरुत्साही वाटणे हे होत असते. आपण सर्वच जण ते अनुभवतो परंतु जरी आपला मूड नसला तरी रोजची कामे आपण सहसा टाळत नाही. मूड नसण्याचा परिणाम जेव्हा आपल्या दैनंदिन कामावरती जाणवू लागतो किंवा या भावनेची तीव्रता वारंवारता आणि कालावधी वाढत जातो त्यावेळी मानसिक अनारोग्याच्या दिशेने वाटचाल होऊ लागते.
‘आनंदी आनंद गडे’ ही कविता लिहिणारे बालकवी एका कवितेत म्हणतात, ‘कोठुनी येते मला कळेना उदासीनता ही हदयाला. काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतरह्रदयाला.’ बालकवींनी आपल्या मनाची भावनिक आंदोलने खूप उत्कट पद्धतीने व्यक्त केली आहेत. आपण सर्वजण अशी आंदोलने अनुभवत असतो. काहीवेळा आपल्याला खूप उत्साह वाटतो, काहीवेळा कंटाळा येतो. कधी आपण खुश असतो तर कधी निराशही असतो. आपलेही मूड्स बदलतात. अशा या मूड्सच्या लाटा छोटय़ा स्वरुपात आपण सर्वच अनुभवत असतो. मनातील भावना, मनाचे रंग बदलत जाणे हे पूर्णतः नैसर्गिक आहे. आपल्या मेंदूतील रसायने कमी जास्त होत असतात त्यामुळे असे होते. जसे दिवसरात्रीच्या चौवीस तासात हवामान बदलणे, वातावरणाचे तापमान बदलणे हे जेवढे नैसर्गिक आहे तेवढेच हेही नैसर्गिक आहे.
काहीवेळा आपला मूड बदलला की त्याची कारणे आपण बाह्य आयुष्यात शोधत असतो. काहीवेळा ती मिळतातही.. कारण काही ना काही मनाविरुद्ध घडलेले असते. असे घडले म्हणून मूड गेला, उदासीनता आली असे आपण म्हणतो. परंतु असे काहीही घडले नाही तरीदेखील उदासीनता येऊ शकते.
कारण आपल्या मेंदूतील आणि शरीरातील रसायने सतत बदलत असतात. मेंदूतील सेरेटोनीन हे रसायन सतत बदलत असते. त्यानुसार आपल्या भावना बदलतात. आपले ब्लडप्रेशर देखील दिवसभरात निसर्गतः बदलत असते, सकाळपेक्षा दुपारी रक्तावरचा दाब वाढलेला असतो. आपली श्वासाची गती, पाचक स्रावही बदलतात. शरीराचे तापमान ठरावीक रेंजमध्ये बदलते, रक्तातील साखरेचे प्रमाण बदलते. शरीरात जसे बदल होतात तसेच मनाच्या स्थितीतही होतात. काहीवेळा आपल्याला छान वाटते, अगदी सुखद वाटते. काहीवेळा उदास वाटते, अस्वस्थ वाटते. हे नैसर्गिक आहे परंतु जर हे उदास वाटणे सतत होऊ लागले, दैनंदिन कामात ते अडथळा बनू लागले तर मात्र सारे अवघड होऊन जाते.
परंतु याबाबत सजगता गरजेची आहे. आपली वाटचाल मानसिक अनारोग्याच्या दिशेने होत तर नाही ना हे कळण्यासाठी आपल्या मनात डोकावून पाहणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने आपण शरीराची काळजी घेतो, शरीराच्या स्वच्छतेविषयी जागरुक असतो तसे मनाच्या स्वच्छतेविषयी जागरुक असतो का/आहोत का हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. मनामध्ये नकारात्मक विचार, भावना येणे नैसर्गिक आहे परंतु त्याकडे लक्ष नसेल आणि त्याची तीव्रता, वारंवारता आणि कालावधी वाढत गेला तर मात्र मानसिक आरोग्याला धोका निर्माण होतो. म्हणजेच मनात निर्माण होणाऱया भावना, विचार याकडे लक्ष असणे, स्वतःच्या मनात रोज दहा मिनिटे शांत बसून डोकावून पाहणे आवश्यक आहे. मनात येणारे विचार भावना उत्सुकतेने न्याहाळणे आणि प्रतिक्रिया न करता ते स्वीकारण्याचे तंत्र अवगत करणे गरजेचे आहे.आपल्या भावनिक मेंदूतील अमायग्डला हा भाग सतत प्रतिक्रिया करत असतो. ज्यावेळी कोणताही धोका जाणवतो त्यावेळी अमायग्डला लगेच रीऍक्ट करतो. त्याच्या प्रतिक्रियेमुळे आपल्या शरीरात काही रसायने पाझरतात आणि त्यामुळे शरीर-मनाच्या तीन स्थिती निर्माण होतात. फाईट, फ्लाईट, फ्रीज. धोका कळता क्षणी मनात राग निर्माण होतो आणि आपण आलेल्या संकटाचा सामना करू शकतो, मनात भीती निर्माण होते आपण त्या धोक्मयापासून पळू शकतो, फ्रीज म्हणजे जसे एखादे संकट आल्यावर प्राणी मूर्च्छा आल्यासारखे पडून राहतात तसे आपले शरीर मन फ्रीज होते ज्याला आपण उदासी वा डिप्रेस्ड इमोशन म्हणू शकतो. म्हणजेच भीती, राग, उदासी, चिंता या भावना अमाग्डलाची प्रतिक्रिया म्हणून उत्पन्न होतात.
अमायग्डलाची प्रतिक्रिया म्हणून भावनांची निर्मिती होते किंवा अनेकदा अतार्किक, अशास्त्रीय विचारपद्धतीही भावनांच्या उद्भवास कारणीभूत ठरते. तसेच काही विशिष्ट रसायनेही भावनांच्या उद्भवास कारणीभूत असतात. त्यामुळे या सर्व बाबतीत जागरुक राहात नियमितपणे मनाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे. त्यासाठी आपल्या मनात डोकावून पाहणे, विचार भावना याविषयी सजग असणे गरजेचे आहे हे मात्र खरे!
Ad. सुमेधा देसाई, मो.94226 11583








