प्रसाद सु. प्रभू /बेळगाव :
कोरोनाचा फेरा वाढत चाललाय, मृत्यूचा दर वाढतोय, मात्र सर्वजन कोरोनानेच दगावतायेत असे नाही. योग्य उपचार योग्य वेळेत न मिळाल्याने आलेल्या मानसिक ताणातून अनेकांचा मृत्यू होतोय. डॉक्टरांनी हात वर केलेत, काही अपवाद वगळता बरेचसे डॉक्टर अंडर ग्राऊंड झालेत आणि खासगीमध्ये जेथे उपचार शक्य आहेत. तेथे असणार दर सर्व सामान्यांना परवडत नाही अशी स्थिती आहे. अशा वातावरणात आता अंडर ग्राऊंड डॉक्टरांनी बाहेर पडावे, अशी हाक बेळगावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.
उपचार करणारे डॉक्टरच नाहीत आणि नको तेथे उपचार घ्यावे लागल्याने आर्थिक लूट झालीच शिवाय रुग्णही दगावला, असे अनुभव अनेकांना येताहेत. या प्रश्नावर माजी नगरसेवक आणि बेळगावातील विविध संस्थांशी संबंधित नेताजी जाधव यांनी आपली भूमिका मांडली. दरवर्षी पावसाळ्यात सर्दी, खोकला, पडसे हे विकार होतातच, ते यंदाही होताहेत, मात्र या आजारावर उपचार करण्यास डॉक्टरच मिळत नाहीत ही शोकांतिका आहे. खासगी इस्पितळांमधील उपचारांचा खर्च परवडत नाही. आपल्याला हक्काच्या डॉक्टरकडून उपचार घेतल्याचे समाधानही मिळत नाही. अशा परिस्थितीत रुग्णांनी जायचे कोठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आयएमए सारख्या डॉक्टरांच्या संघटनांनी पुढे येऊन आता सामान्य रुग्णांच्या देखभालीची जबाबदारी घ्यावी. डॉक्टरी सेवेची पन्नाशी पूर्ण करणाऱया डॉ. सतीश याळगी यांच्यासारख्या महान व्यक्तीमत्त्वाचा आदर्श घ्यावा, अन्यथा विश्वास उडून जाईल आणि रुग्णांची परवड होतच राहील. अशी धास्ती त्यांनी व्यक्त केली.
रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामधील दुवा म्हणून कित्येक वर्षे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे यांनी आयएमए सारख्या संस्थांनी सेवेचा केवळ बाऊ न करता प्रत्यक्ष काम करण्याची गरज व्यक्त केली. सध्या केवळ हाताच्या बोटावर मोजण्याईतके डॉक्टर रुग्ण सेवा करत आहेत. कित्येक कोविड रुग्णांना फॅमिली डॉक्टर्सनी घरात बरे केल्याची उदाहरणे आहेत. मात्र काही डॉक्टर गायब झाले असून अशांना झोपी गेलेल्या आरोग्य खात्याने नोटीस बजावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
आपण स्वत: अनेक कोविडग्रस्त रुग्णांचे समुपदेशत केले आहे. उपचारादरम्यान आपल्याला धोका होऊ शकतो, असे सांगून आपल्या कर्तव्यापासून डॉक्टरांनी दूर जाऊ नये, डॉक्टरांना काही झाल्यास त्यांच्यासाठी लागणार वाट्टेल तितका खर्च जमा करण्यास आम्ही बेळगावकर तयार आहोत. दरम्यान डॉक्टरांनी आता भिती न बाळगता सर्व सामान्य नागरिकांसाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सोयींचा अभाव आणि परवड टाळण्यासाठी खासगी इस्पितळात जाणाऱया रुग्णांची होत असलेली लुट अन्यायकारक व संतापजनक असल्याचेही ते म्हणाले.

हातामध्ये अडीच लाख रुपये असतानाही शहरातील 22 इस्पितळांची दारे ठोठवावी लागलेल्या सामाजिक कार्यकर्ते सतीश मोरे यांनी एकंदर परिस्थिती बद्दल चिड व्यक्त केली. कोविडच्या परिस्थितीत अक्षरश: धंदा सुरु झाला आहे. आणि भिती निर्माण करून माणुसकीला काळीमा फासण्याचेच काम सुरु असल्याचे ते म्हणाले.
शत्रूने आक्रमण केले की लष्करी जवान जीवावर उदार होऊनच लाढतात. त्यांना भिती नसते का? माग आरोग्यावर रोगाचे आक्रमण झाले तर डॉक्टरांची जबाबदारी नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर डॉक्टरांनीच दरवाजे बंद केले तर सामान्य सामान्य रुग्णांनी जायचे कोठे? असा प्रश्नही त्यांनी मांडला.
अनेक डॉक्टर 144 कलम आहे, असे सांगून रुग्णांवर उपचार करण्यास नकार देत आहेत. अशावेळी जेथे उपचार मिळतात तेथे दादागिरी करून रुग्णांना दाखल करण्याची वेळ येत असून ही स्थिती सुधारली नाही तर मृत्यूची दर आणखीनच वाढणार, अशी भिती त्यांनी व्यक्त केली.









