मंत्री विश्वजित राणे यांचे उद्गार : धारबांदोडय़ातील सेविकांचा सन्मान
प्रतिनिधी / धारबांदोडा
कोरोना महामारीच्या काळात अंगणवाडी सेविकांनी केलेले कार्य अविस्मरणीय असून या सेवेत एकप्रकारचे भावनिक नाते जोडलेले आहे. अंगणवाडी सेविकांच्या मागण्याची सरकार योग्य दखल घेणार आहे. तसेच स्व. मनोरमा राणे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी उत्कृष्ट मुख्य सेविका, सेविका, साहाय्यक असे पुरस्कार देण्यात येतील. त्यासाठी आपण रु. 50 लाखांची तरतूद करणार असल्याची घोषणा महिला व बालकल्याणमंत्री विश्वजित राणे यांनी केली.
धारबांदोडा तालुका प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरीत केलेल्या महिला व बालकल्याण कार्यालयाच्या उद्घाटन सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचा कोरोना योद्धा म्हणून यावेळी सन्मान करण्यात आला. स्थानिक आमदार तथा बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, महिला व बालकल्याण खात्याच्या संचालिका दिपाली नाईक, उपसंचालिका ज्योती देसाई, सीडीपीओ शैला नाईक, स्वाती प्रभू व छाया गडकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
सामान्य जनतेला त्यांच्या गरजांप्रमाणे त्यांच्या पाल्यांना शिक्षण मिळावे यासाठी गोव्यातील अंगणवाडय़ा मॉडेल पद्धतीने विकसित करण्याचा आपला प्रयत्न आहे. मात्र कोरोना महामारीमुळे त्यात विलंब झाला आहे. अंगणवाडय़ांच्या इमारत दुरुस्तीसाठी मंत्री दीपक पाऊसकर यांचे चांगले सहकार्य लाभत आहे, असेही मंत्री राणे यांनी नमूद केले.
मंत्री दीपक पाऊसकर म्हणाले, आपली आई अंगणवडी सेविका होती. त्यांचे काम आपण जवळून पाहिले आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांची व्यथा आपण जाणू शकतो. कमी पगार असूनही त्यांनी कोरोना काळात उत्कृष्ट सेवा बजावली आहे. धारबांदोडा तालुक्यात काही अंगणवाडय़ा भाडय़ाच्या खोलीत भरतात. त्यांना स्वतःची जागा मिळावी यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. मंत्री विश्वजित राणे यांनी नवीन अंगणवाडी सुरु करताना स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण करुन दिली आहे, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले. यावेळी महिला व बालकल्याण खात्यातर्फे धारबांदोडा तालुक्यातील पूरग्रस्त अंगणवाडी सेविका सुलोचना गावकर, उज्ज्वला शिवडेकर व जस्मिन कालेकर यांना अर्थिक मदत देण्यात आली.
धारबांदोडा तालुक्यातील उत्कृष्ट मुख्य सेविका म्हणून रेखा नाईक, उत्कृष्ट सेविका म्हणून कोमल गावकर व उत्कृष्ट साहाय्यक म्हणून उज्ज्वला शिवडेकर यांचा सन्मान करण्यात आला. मंत्री विश्वजित राणे व मंत्री दीपक पाऊसकर यांच्याहस्ते यावेळी धारबांदोडा तालुक्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱयांना सन्मानीत करण्यात आले. दिपाली नाईक यांनी स्वागत केले. सिद्धी उपाध्ये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर शैला नाईक यांनी आभार मानले. तत्पूर्वी स्थलांतरीत कार्यालयाचे मंत्री विश्वजित राणे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.









