प्रतिनिधी / सातारा :
अंगणवाडी सेविकांचे कामकाज ऑनलाईन करण्यासाठी सरकारने त्यांना मोबाईल हँडसेट पुरविले होते. मात्र, दोन वर्षात काम वाढत गेले आणि मोबाईलची क्षमता कमी पडत गेली. त्यातच दुरूस्तीचा खर्च परवडेना यामुळे सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी त्यांना दिलेले मोबाईल हॅडसेट बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात परत केले आहेत.
सातारा जिल्ह्यात 4 हजार 500 अंगणवाडी सेविका व मदतनीस आहेत. यांना सरकारी कामासाठी हे मोबाईल देण्यात आले होते. हे मोबाईल दोन जीबी रॅमचे आहेत. त्या तुलनेत लाभार्थ्यांची भरावयाची माहिती खूप जास्त आहे. यामुळे मोबाईल हँग होतात. निकृष्ट दर्जाचे हे मोबाईल असल्याने त्यांच्या दुरूस्तीसाठी तीन हजारापासून आठ हजार रूपयांपर्यंत खर्च येतो. तसेच सरकारचे पोषण ट्रॅकर ऍप या मोबाईलमध्ये डाउनलोड होत नसल्याने हे मोबाईल परत करण्यात आले.









