विविध मागण्यांसाठी दिले निवेदन

प्रतिनिधी /बेळगाव
अंगणवाडी महिला कर्मचाऱयांनी एआयटीयुसी आणि सिटूच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन विविध मागण्यांसाठी निवेदन दिले. नोकरीत कायमस्वरुपी सामावून घ्यावे, आरोग्य विमा लागू करावा, कनिष्ठ 21 हजार रुपये वेतन देणे, निवृत्तीनंतर 10 हजार पेन्शन देणे यासह इतर मागण्या या अंगणवाडी कर्मचाऱयांनी केल्या आहेत.
अंगणवाडी महिला कर्मचारी मुलांना शिक्षण देण्याबरोबरच आरोग्य विभागाची सर्व कामे करत आहेत. असे असताना त्यांना अजूनही नोकरीत कायमस्वरुपी सामावून घेण्यात आले नाही. लहान मुलांना पौष्टिक आहार देणे, गर्भवती महिलांना सर्व लस देण्यासाठी जनजागृती करणे याचबरोबर त्यांना आहार देणे हे काम करत आले आहेत. असे असताना वेतन मात्र तुटपुंजे दिले जात आहे.
अंगणवाडी कर्मचाऱयांना किमान 21 हजार रुपये वेतन द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी निवेदनात केली. कोरोना काळात आपला जीव धोक्मयात घालून काम केले असल्याने किमान 10 हजार रुपये भत्ता द्यावा, असेही या निवेदनात म्हटले आहे. सेवेनुसार वेतनामध्ये वाढ करावी, खासगीकरण करू नये, प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेच्या आत पगार द्यावा यासह इतर मागण्या करण्यात आल्या. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड. नागेश सातेरी, वाय. बी. शिगीहळ्ळी, मीनाक्षी कोटगी, मंदा नेवगी, एस. बी. बेळगावकर, एस. एस. ठोमरे, मनीषा होनगेकर, गंगु कदम, रेणुका शिंदे यांच्यासह महिला उपस्थित होत्या..









