प्रतिनिधी/ मडगाव
अंकोला-कर्नाटक येथे शनिवारी रात्री 8.30च्या दरम्यान झालेल्या दुचाकी व कार अपघातात चंद्रवाडा-फातोर्डा येथील निहाल निशालदार (19) हा युवक जागीच ठार झाला. तर आतिफ शेख (24) हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. उपलब्ध माहिती प्रमाणे हे दोन्ही युवक दुचाकीवरून केरळ येथे एका मशिदला भेट देण्यासाठी गेले होते. मशिदला भेट देऊन परत येत असताना त्यांना अंकोला येथे अपघात झाला.
हाती आलेल्या माहिती प्रमाणे, अंकोला-कर्नाटक येथे सद्या रस्त्याचे काम सुरू असून काल शनिवारी काम सुरू असल्याने, वाहतूक एकेरी मार्ग करण्यात आली होती. त्यात निहाल व आतिफ भरधाव वेगाने दुचाकीवरून गोव्याकडे येत असताना समोरून येणाऱया कारला त्यांनी जोरदार धडक दिली. त्यात निहाल जागीच ठार झाला. तर आतिफ शेख जखमी झाल्याने, त्याला उपचारासाठी जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले.
ज्या कारला त्यांनी धडक दिली. त्या कारमधुन चार वकील बेंगलोरहून गोव्यात आले होते. गोव्यात फिरून झाल्यानंतर ते पुन्हा बेंगलोरकडे जात असताना, त्याच्या कारला दुचाकीची धडक बसली. ही धडक येवढी जबरदस्त होती की, दुचाकीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. त्याच बरोबर कारच्या दर्शनी भागाची बरीच हानी झाली होती.
अपघातात ठार झालेला निहाल निशालदार हा मुळचा हुबळी येथील असून तो चंद्रवाडा-फातोर्डा स्थायिक झालेला होता. अत्यंत गरीब घराण्यातील हा युवक फातोडर्य़ातील एका दुचाकी दुरूस्त करण्याच्या गॅरेजमध्ये काम करायचा. दुचाकी दुरूस्त करण्याचे ज्ञान त्याने बऱयापैकी आत्मसात केल्याने, या भागात तो बराच परिचित होता. त्याच्या निधनाचे वृत्त ऐकून अनेकांना धक्काच बसला. काल रविवारी, चंद्रवाडा-फातोर्डा येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.









