मेलबर्न : ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळण्याचे अंकिता रैनाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले असून ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी सुरू असलेल्या पात्रतेच्या अंतिम फेरीत तिला पराभव स्वीकारावा लागला.
दुबईत घेण्यात येत असलेल्या या पात्रता स्पर्धेत अंकिताला तिसऱया व शेवटच्या फेरीत सर्बियाच्या ओल्गा डॅनिलोविचकडून 2-6, 6-3, 1-6 असा पराभव पत्करावा लागला. सुमारे दोन तास ही लढत रंगली होती. पहिल्या सर्व्हवर गुण मिळविता आले नाहीत, याबद्दल तिने नंतर खेद व्यक्त केला. ग्रँडस्लॅम स्पर्धेत भाग घेण्यासाठी अंकिताने केलेला हा सहावा प्रयत्न होता. तिचा पराभव झाल्याने सुमित नागल हा एकमेव भारतीय या मोसमातील पहिल्या ग्रँडस्लॅममध्ये एकेरीत खेळताना दिसेल. नागलला या स्पर्धेसाठी वाईल्डकार्ड प्रवेश मिळाला आहे. रामकुमार रामनाथनला मात्र पात्रतेच्या पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली तर प्रज्नेश गुणेश्वरनला फ्रान्सच्या कॉन्स्टन्ट लेस्टीनेकडून दुसऱया फेरीत 2-6, 3-6 असा पराभव स्वीकारावा लागला.









