कोलकाता / वृत्तसंस्था
झिम्बाब्वेचे माजी कर्णधार अँडी फ्लॉवर यांची शुक्रवारी आयपीएलमधील लखनौ प्रँचायझीच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. लखनौ प्रँचायझीचे 2022 इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत पदार्पण होणार आहे. मागील 2 हंगामात फ्लॉवर हे पंजाब किंग्सच्या साहायक प्रशिक्षकपदी कार्यरत होते. केएल राहुल पंजाबच्या कर्णधारपदी कार्यरत होता. तो देखील लखनौ संघाशी करारबद्ध होईल, अशी चर्चा आहे.
अँडी फ्लॉवर प्रशिक्षक असताना इंग्लंडने 2010 मधील आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. याशिवाय, त्यांनी इंग्लंडला कसोटी क्रिकेटमध्येही अव्वलमानांकन प्राप्त करुन दिले होते. संजीव गोएंका यांच्या आरपी-एसजी ग्रूपने 7090 कोटी रुपयांना लखनौ प्रँचायझीची खरेदी केली आहे.









