तिसरी कसोटी तिसरा दिवस : अझहर अलीचे अर्धशतक, फॉलोऑन टाळण्यासाठी पाकला अद्याप 261 धावांची गरज
वृत्तसंस्था/ साउदम्प्टन
तिसऱया व अखेरच्या कसोटीच्या तिसऱया दिवशी यजमान इंग्लंडने मजबूत पकड मिळविली असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पाकने पहिल्या डावात 5 बाद 122 धावा जमविल्या होत्या. कर्णधार अझहर अलीने मालिकेतील पहिले अर्धशतक झळकवले असून तो 56 व मोहम्मद रिझवान 13 धावांवर यावेळी खेळत होते. भेदक मारा करणाऱया जेम्स अँडरसनने 32 धावांत 4 बळी मिळविले होते.
या सामन्यातही पावसाचा वारंवार अडथळा आल्याने तिसऱया दिवशी उपाहारासाठी खेळ लवकर थांबवावा लागला होता. या कसोटीत झॅक क्रॉलीचे शानदार पहिले द्विशतक (267) व जोस बटलरचे शतक (152) यांच्या चमकदार फलंदाजीमुळे इंग्लंडने पहिला डाव 8 बाद 583 धावांवर घोषित केला. त्यानंतर दुसऱया दिवशीअखेर पाकचे तीन फलंदाज केवळ 24 धावांत तंबूत धाडत त्यांनी सामन्यावर पकड मिळविली. अँडरसनने शान मसूद (4), अबिद अली (1) व बाबर आझम (11) यांना बाद करीत पाकला अडचणीत आणले. 3 बाद 24 या धावसंख्येवरून पाकने तिसऱया दिवशी खेळ पुढे सुरू केला आणि आसद शफीकला अँडरसनने रूटकरवी झेलबाद केल्यावर 4 बाद 30 अशी त्यांची स्थिती केली. अझहर अली व फवाद आलम यांनी 45 धावांची भर घातली. पण फवादला बेसने बटलरकरवी झेलबाद करून ही जोडी फोडले. फवादने 21 धावा जमविल्या. अझहर व रिझवान सावध खेळ करीत असून त्यांनी 51.4 षटकाअखेर संघाला 5 बाद 122 धावांपर्यंत मजल मारून दिली होती.
यावेळी अझहरने 56 तर रिझवानने 13 धावा जमविल्या होत्या. पाक संघ 461 धावांनी पिछाडीवर होता आणि फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना अद्याप 261 धावांची जरूरी होती. इंग्लंडला दहा वर्षाच्या खंडानंतर मायदेशात पाकविरुद्धची मालिका जिंकण्याची संधी मिळाली असून हा सामना अनिर्णीत राहिला तरी पहिली कसोटी जिंकली असल्याने त्यांनाच मालिकाविजय मिळणार आहे.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प.डाव 154.4 षटकांत 8 बाद 583 डाव घोषित (क्रॉली 267, बटलर 152, वोक्स 40, रूट 29, बेस 27, सिबली 22, अवांतर 22, शाहीद आफ्रिदी 2-121, यासिर शहा 2-171, फवाद आलम 2-46, आसद शफीक 1-24, नसीम शहा 1-109). पाक प.डाव 51.4 षटकाअखेर 5 बाद 122 (मसूद 4, अबिल अली 1, बाबर आझम 11, आसद शफीक 5, फवाद आलम 21, रिझवान खेळत आहे 13, अझहर अली खेळत आहे 56, अवांतर 11, अँडरसन 4-32, बेस 1-22).









