भारताविरुद्ध टी-20 मालिकेसाठी लंकन संघाची घोषणा, मलिंगाकडे नेतृत्व कायम
वृत्तसंस्था/ कोलंबो
नव्या वर्षाच्या प्रारंभी श्रीलंकन क्रिकेट संघ भारत दौऱयावर येणार आहे. 5 जानेवारीपासून भारत व श्रीलंका संघात 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी बुधवारी लंकन संघाची निवड करण्यात आली आहे. श्रीलंका संघात अँजेलो मॅथ्यूजचे पुनरागमन झाले आहे. तो मागील काही दिवस दुखापतीचा सामना करत होता. पण आता तो दुखापतीतून सावरला असून भारताविरुद्ध खेळण्यास सज्ज झाला आहे.
लंकन निवड समितीने बुधवारी 16 सदस्यीय श्रीलंकन संघाची घोषणा केली. या मालिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाकडे नेतृत्वाची धुरा कायम ठेवली आहे. पाकिस्तानविरुद्ध मालिकेत मॅथ्यूजच्या अंगठय़ाला दुखापत झाली होती. यामुळे दोन आठवडे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. आता मॅथ्यूज दुखापतीतून सावरला असून भारताविरुद्ध मालिकेसाठी उपलब्ध असणार असल्याची माहिती निवड समितीने दिली. तसेच या संघात कुशल परेरा, दानुष्का गुणथिलके, अविष्का फर्नांडो, ओशादा फर्नांडो आणि दसुन शनाकाला स्थान देण्यात आले आहे. तसेच यष्टीरक्षक निरोशन डिक्वेला आणि कुशल मेंडिस या स्टार खेळाडूंचीही संघात वर्णी लागली आहे.
जखमी नुवान प्रदीपची माघार
गोलंदाजांमध्ये मलिंगाशिवाय वनिन्दु हसरंगा, लक्षण संदकन, धनंजय डी सिल्वा, लहिरु कुमारा आणि इसारु उडाना यांना संघात स्थान देण्यात आले आहे. अनुभवी गोलंदाज नुवान प्रदीपला दुखापतग्रस्त असल्याने त्याला संधी देण्यात आलेली नाही.
भारत व श्रीलंका संघात पहिला टी 20 सामना 5 जानेवारी रोजी गुवाहाटी येथे होईल. यानंतर दुसरा सामना 7 रोजी इंदोरला तर तिसरा सामना 10 रोजी पुणे येथे होणार आहे.
श्रीलंकन टी-20 संघ- लसिथ मलिंगा (कर्णधार), कुशल परेरा, दानुष्का गुणथिलके, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, ओशादा फर्नांडो, दसुन शनाका, अँजेलो मॅथ्यूज, निरोशान डिक्वेला कुशल मेंडिस, हसरंगा, लक्षण संधकन, धनंजया डीसिल्वा, लहिरु कुमारा व इसारु उदाना.









