वृत्तसंस्था/ ऍडलेड
जर्मनीच्या अँजेलिक केर्बरला दुखापत झाल्याने ऍडलेड इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपन या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या तयारीवरही परिणाम झाला आहे.
2016 मध्ये केर्बरने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळविले असून येथील स्पर्धेत युक्रेनच्या डायना यास्त्रेम्स्काविरुद्धच्या दुसऱया फेरीतील लढतीच्या दुसऱया सेटमधून तिने पाठदुखीमुळे माघार घ्यावी लागली. यावेळी ती 3-6, 0-2 अशी पिछाडीवर पडली होती. दुसऱया सेटच्या सुरुवातीलाच तिला वेदना सुरू झाल्या होत्या आणि दोन गेमध्ये झाल्यानंतर तिने सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. तिने तिसऱया गेमवेळी मेडिकल ट्रेनरला कोर्टवर बोलावले होते. पण त्याने तपासणी केल्यानंतर केर्बरने माघार घेतल्याचे सांगितले. अन्य एका सामन्यात क्रोएशियाच्या डोना व्हेकिकने ग्रीसच्या मारिया सक्करीचा 2-6, 7-5, 6-1 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिची पुढील लढत यास्त्रेम्स्काविरुद्धच होणार आहे.
पुरुष विभागात रशियाच्या आंदे रुबलेव्हने अमेरिकेच्या सॅम क्वेरीचा 6-3, 6-3 असा पराभव करून शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. त्याची लढत ब्रिटनच्या डॅन इव्हान्सशी होणार आहे. या मोसमात त्याने आतापर्यंत पाच सामने खेळले असून त्याने सर्व सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा पात्रता फेरीतून आलेला लॉईड हॅरिसनेही उपांत्यपूर्व फेरी गाठली असून त्याने चिलीच्या सहाव्या मानांकित ख्रिस्तियन गॅरिनवर 7-6 (7-5), 6-3 अशी मात केली.