श्रीराम पित्याच्या शब्दांचा मान राखण्यासाठी वनात निघून गेला असला तरी कैकयीला अचानक त्याच्याबद्दल मत्सर वाटत नव्हता. खरेतर राम तिन्ही मातांचा अतिशय लाडका होता. सर्व राण्या रामाला युवराज्याभिषेक होणार म्हणून आनंदात होत्या. पण……मंथरा…तीच ती कैकयीची दासी! जी कैकयीच्या लग्नानंतर तिच्याबरोबर अयोध्येत आली. तिनेच कैकयीचे लहानपणापासून पालनपोषण केले होते. तिनेच प्रथम कैकयीला सांगितले की, ‘चैत्र महिन्यात राजा दशरथ रामाला राज्याभिषेक करणार आहे.’ ही आनंदवार्ता ऐकून कैकयी खुश झाली. तिने बक्षीस म्हणून कैकयीला एक दागिना काढून दिला. पण मंथरेने तो फेकून दिला. खरे म्हणजे कैकयीचा रामावर फार जीव होता. तिने रामाला कोडकौतुकाने वाढवले होते. तर भरताचे लाड कौसल्या करीत असे. अशा या मंथरेने कैकयीला आठवण करून दिली की, ‘दशरथाने तुला देऊ केलेले दोन वर मागण्याची हीच वेळ आहे. तू भरताला युवराज्याभिषेक करायला राजाला भाग पाडू शकतेस. तरीही कैकयी म्हणाली की, सर्वार्थाने रामालाच युवराज्याभिषेक होणे योग्य आहे. रघुकुळाची तीच रीत आहे पण एवढय़ावर थांबेल ती मंथरा कसली, तिने कैकयीतला स्त्रीमत्सर जागा केला. तिने तिमिरध्वजाबरोबर झालेल्या युद्धात दशरथाला सहाय्य करून त्याचे प्राण कसे वाचवले, त्याबद्दल त्याने कैकयीला दोन वर मागण्यास सांगितले. कैकयीने योग्य वेळ येताच ते मागेन असे सांगितले… इ. ची आठवण मंथरेने तिला करून दिली. कोण होती ही मंथरा? तिच्याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. एका कथेनुसार कैकयी आणि मंथरा केकय देशातीलच होत्या. केकय देशाचा राजा अश्वपतिचा ब्रुहदश्व नावाचा भाऊ होता. त्याला रेखा नावाची एक सुंदर आणि बुद्धिमान कन्या होती. तिला एक आजार झाला आणि तिच्यावर उपचार केल्यावर ती बरी झाली, पण नंतर तिचा कणा पूर्णपणे वाकला. त्यामुळे तिचे नाव मंथरा पडले. नंतर ती अविवाहित राहिली आणि कैकयीबरोबर दासी म्हणून आली. एका कथेनुसार ती गंधर्वकन्या होती, तर एका कथेत ती प्रल्हादाचा पुत्र विरोचनाची मुलगी होती. वाल्मिकी रामायणात मात्र ती इंद्राने पाठवलेली अप्सरा होती. जी रामाला वनवास देण्यासाठी आली होती. त्याप्रमाणे तिने आपली कामगिरी पार पाडली होती. राम 14 वर्षांसाठी वनवासाला निघून गेल्यावर आजोळी गेलेल्या भरत आणि शत्रुघ्नाला अयोध्येत बोलावण्यात आले. जेव्हा सारी हकिगत दोघांना कळली, तेव्हा शत्रुघ्न अतिशय संतापला आणि त्याने मंथरेच्या कुबडावर लाथ मारली अशी कथा वाचायला मिळते.
Previous Articleकोरोनाच्या नियमावलीत शहरात राम नामाचा जप
Next Article जीव गुदमरत असताना…
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.