नवहिंद युवक मंडळ बापट गल्लीच्यावतीने स्पर्धेचे आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
नवहिंद युवक मंडळ बापट गल्लीच्यावतीने होम मिनिस्टर या गल्ली मर्यादित स्पर्धेत सविता पाटील विजेत्या ठरल्या. स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नागनाथ स्वामी, खासदार मंगला आंगडी, आमदार अनिल बेनके, नगरसेवक जयतीर्थ सौंदती, शंकर पाटील, पंचमंडळ आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिवप्रतिमेचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाच्यावतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. राजू माने शो मेकर निपाणी यांनी सुरेख पद्धतीने मनोरंजन करीत होम मिनिस्टर स्पर्धा, उखाणे, मनोरजक खेळ, हास्यविनोद करून सर्वांची मने जिंकली.
यावर्षीच्या होम मिनिस्टरचा बहुमान सविता पाटील यांनी पटकाविला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी व चषक देऊन त्यांना गौरविण्यात आले. गतवर्षी दहावी व बारावी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरव करून शुभेच्छा दिल्या. आमदार अनिल बेनके यांनी नवहिंद मंडळाला शुभेच्छा देऊन कोविड प्रतिबंधक लसीकरण या भागात 100 टक्के पार पाडल्याबद्दल गल्लीतील कार्यकर्त्यांचे आभार मानले.









