आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध : कशी घ्यावी बाधितांची काळजी, कुठले औषध घ्यावे यासंबंधी सूचना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ओमिक्रॉनच्या वाढत्या फैलावादरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सौम्य आणि लक्षणेरहित कोरोनाबाधितांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. कोरोना महामारीदरम्यान कुठलाही रुग्ण आणि त्याच्या कुटुंबियांनी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी हे नव्या दिशानिर्देशांमध्ये सांगण्यात आले आहे.
संबंधित रुग्णाची ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल 93 टक्क्यांपेक्षा अधिक असायला हवी. सौम्य लक्षणे असणारे आणि ताप तसेच श्वसनात त्रास होत नसला तरीही त्यांची ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल 93 टक्क्यांहून अधिक असायला हवी असे म्हटले गेले आहे.
रुग्णांसाठीचे दिशानिर्देश
बाधिताने घरातील अन्य सदस्यांपासून स्वतःला वेगळे करावे. रुग्णांनी निश्चित खोलीत रहावे. बाधिताने खेळती हवा असलेल्या खोलीत क्रॉस व्हेंटिलेशनसोबत रहावे, मोकळी हवा येण्यासाठी खिडक्या खुल्या ठेवाव्यात.
रुग्णाने भरपूर आराम करावा आणि द्रव्यपदार्थांचे सेवन करावे.
किमान 40 सेकंदांसाठी साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवावेत. रुग्णाने कुटुंबियांसोबत भांडी किंवा अन्य सामग्रीचा एकत्रित वापर करू नये. खोलीत वारंवार स्पर्श होणाऱया पृष्ठभागावर साफ करावे. रुग्णाच्या लक्षणांवर नजर ठेवावी. लक्षणे तीव्र झाल्यास त्वरित डॉक्टरांना कळवावे.
बाधिताच्या संपर्कात आल्यास..
बाधिताच्या शरीरातील द्रव्यपदार्थाच्या (श्वसन, लाळेसह तोंडातून येणारा स्राव) थेट संपर्कापासून दूर रहावे. बाधिताला सांभाळताना डिस्पोजेबल ग्लोव्ह्जचा वापर करावा. बाधिताला त्याच्या खोलीतच जेवण पुरवावे.
मास्कचा वापर कसा करणार?
बाधितांनी सदैव ट्रिपल लेयर मेडिकल मास्कचा वापर करावा. मास्क ओला झाल्यास किंवा अस्वच्छ झाल्यास तो वापरू नये. खोलीत रुग्णाची देखभाल करणाऱया व्यक्तीने एन-95 मास्क वापरावा.
उपचारविषयक दिशानिर्देश
बाधितांने उपचार करणाऱया डॉक्टरासोबत संपर्कात रहावे. वैद्यकीय अधिकाऱयासी सल्लामसलत करून अन्य औषधांचे सेवन सुरू ठेवावे. रुग्णांनी गरजेनुसार ताप, सर्दी आणि खोकल्यावर उपचार घ्यावेत.
डॉक्टरांकडे कधी जाल?
लक्षणे गंभीर होत असल्यास तत्काळ डॉक्टरांची मदत घ्यावी. 100 डिग्री ज्वर, श्वास घेण्यास त्रास, ऑक्सिजन पातळी खालावणे, छातीत वेदना आणि तीव्र थकवा अशी लक्षणे यात सामील असू शकतात.ं
होम आयसोलेशन कधी संपवाल?
7 दिवस पूर्ण झाल्यास आणि मागील 3 दिवसांपासून ज्वर नसल्यास रुग्ण स्वतःचे होम आयसोलेशन संपवू शकतो. परंतु त्यानंतरही त्याला मास्क वापरावा लागणार आहे. होम आयसोलेशनचा कालावधी संपल्यावर पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही.









