प्रतिनिधी/ बेळगाव
हॉटेलमधील कचरा स्वच्छता कर्मचाऱयांकडे देण्याऐवजी कचराकुंडीत टाकण्याचा प्रकार सुरू आहे. याला बेक लावण्यासाठी रात्रीच्या वेळी नजर ठेवण्याची मोहीम महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या पथकाच्या माध्यमातून विविध ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली असून, कचरा टाकणाऱयावर दंडात्मक कारवाई करून 6 हजार रुपये दंड वसूल केला आहे.
शहरात घरोघरी जाऊन कचऱयाची उचल केली जाते. हॉटेलमधील कचऱयाची उचल करण्यासाठी महापालिकेने दोन वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रस्त्याशेजारी आणि खुल्या जागेत कचरा टाकू नये याकरिता महापालिकेकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरात साचणारे कचऱयाचे ढिगारे बंद करण्यासाठी घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करण्याबरोबर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तरीही कचरा रस्त्याशेजारी आणि खुल्या जागेत टाकण्यात येत आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात येत होती. सध्या घरातील कचरा रस्त्यावर टाकण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र हॉटेलमधील कचरा रात्रीच्या वेळी रस्त्याशेजारी आणि कचराकुंडीत टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
रस्त्याशेजारी व कचराकुंडीत हॉटेलमधील कचरा टाकण्यात येत असल्याने भटक्मया कुत्र्यांची संख्या वाढत आहे. कचराकुंडीच्या ठिकाणी कुत्र्यांचा कळप ठाण मांडून बसत असतो. टाकण्यात आलेल्या कचऱयामध्ये खाद्य शोधण्यासाठी भटकी कुत्री व जनावरे कचरा विस्कटतात. परिणामी संपूर्ण रस्त्यावर कचरा पसरत असून दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी हॉटेलमधील कचरा टाकणाऱयांवर नजर ठेवण्यासाठी मनपा कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. दररोज सायंकाळी व रात्रीच्या वेळी कचरा टाकण्यात येणाऱया ठिकाणी नजर ठेवून हॉटेलमधील कचरा टाकणाऱयांना पकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारपासून ही मोहीम शहराच्या विविध भागात राबविण्यात येत असून, कचरा टाकणाऱयांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसात महापालिकेच्या आरोग्य विभागाने विविध ठिकाणी ही मोहीम राबवून सहा हजार रुपये दंड वसूल केला आहे. कचरा टाकताना वारंवार आढळून आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचीही तयारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









