वृत्तसंस्था/ कोविलपट्टी, तामिळनाडू
येथे झालेल्या 11 व्या हॉकी इंडिया कनिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये उत्तर प्रदेश हॉकी संघाने अपराजित राहत अजिंक्यपद मिळविले. अंतिम लढतीत त्यांनी हॉकी चंदिगडचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदवणारा शारदानंद तिवारीने 15 व्या मिनिटाला उत्तर प्रदेश हॉकीचा पहिला गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदवला. त्यानंतर अरुण सहानीने 16 व 34 व्या मिनिटाला दोन गोल नोंदवले. 51 व्या मिनिटाला रमणने हॉकी चंदिगडचा एकमेव गोल नोंदवला. अखेरपर्यंत उत्तर प्रदेशने आघाडी कायम राखत विजेतेपद पटकावले.
‘सांघिक प्रयत्नाच्या जोरावर मुलांनी सर्वस्व पणाला लावत हा विजय साकारला आहे. या संघातील खेळाडूंनी हाच परफॉर्मन्स कायम ठेवला तर ते लवकरच राष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकतील, याची मला खात्री वाटते. उत्तर प्रदेश हॉकी संघाने याआधीही अनेक राष्ट्रीय स्पर्धांत चांगले प्रदर्शन केले आहे. पण अंतिम फेरी गाठून जेतेपद मिळविण्यापर्यंत त्यांना मजल मारता आलेली नाही. या मुलांनी फक्त अंतिम फेरीच गाठली असे नव्हे तर सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रमही केला, याचा मला अभिमान वाटतो,’ असे उत्तर प्रदेश हॉकीचे प्रशिक्षक राजेश सोनकर म्हणाले.
तिसऱया स्थानासाठी झालेल्या लढतीत हॉकी ओडिशाने हॉकी हरियाणाचा 3-2 असा पराभव करून कांस्यपदक मिळविले. 27 व्या मिनिटाला दीपक मिन्झने ओडिशाला आघाडी मिळवून दिल्यानंतर रोहित (34 वे मिनिट) व दीपक 36) यांनी दोन गोल नोंदवून हॉकी हरियाणाला आघाडीवर नेले. चौथ्या सत्रात ओडिशाने आणखी दोन नोंदवत विजय निश्चित केला. सुशांत टोपोने 47 व्या मिनिटाला तर सुदीप चिरमाकोने 49 व्या मिनिटाला हे गोल नोंदवले.









