ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा हैदराबादच्या नामांतरणाचा मुद्दा उपस्थित केलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये हैदराबादऐवजी भाग्यानगर असं शहराचं नाव लिहिण्यात आलंय. नामांतरणाचा मुद्दा लक्षात घेत संघाने जानेवारी महिन्यामध्ये तीन दिवसीय बैठक हैदराबादमध्ये आयोजित केलीय. जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात होणाऱ्या या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून संघाशी संबंधित संस्थाना आमंत्रित करण्यात आलं आहे. “आरएसएसशी संबंधित वेगवेगळ्या संस्थांच्या प्रमुखांची समन्वय बैठक ५ ते ७ जानेवारी २०२२ दरम्यान भाग्यानगरमध्ये आयोजित करण्यात आलीय,” असं सुनील आंबेकर यांनी सांगितल्याचं ट्विट आरएससच्या अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे.