क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
दुसऱया सत्रात केरळ ब्लास्टर्सच्या बचावफळीतील चुकींचा फायदा घेत नोंदविलेल्या चार गोलामुळे हैदराबाद एफसीने आयएसएल फुटबॉल स्पर्धेत एका आकर्षक विजयाची नोंद केली. वास्कोच्या टिळक मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात मध्यंतराला उभय संघ गोलशून्य बरोबरीत खेळत होते.
हैदराबाद एफसीसाठी फ्रान सँडाझाने दोन तर कप्तान आरिदाने सांताना आणि जुवांव व्हिक्टरने प्रत्येकी एक गोल केला. या विजयाने हैदराबाद एफसीला तीन गुण मिळाले. त्यांनी आता पाचव्या स्थानावरून थेट तिसऱया स्थानावर झेप घेतली. त्यांचे आता 18 सामन्यांतून सहा विजय, नऊ बरोबरी आणि तीन पराभवाने 27 गुण झाले आहेत. पराभूत केरळ ब्लास्टर्सचे बाद फेरीत जाण्याचे आव्हान या पराभवाने संपुष्टात आले. त्यांचे आता 18 सामन्यांतून तीन विजय, सात बरोबरी व आठ पराभवाने 16 गुण झाले व त्यांचे दहावे स्थान कायम राहिले.
आता या सामन्यानंतर एटीके मोहन बागानचा संघ 36 गुणांनी पहिल्या, मुंबई सिटी एफसी 34 गुणांनी दुसऱया तर हैदराबाद एफसीचा संघ 27 गुणांनी तिसऱया स्थानावर आहे. 26 गुण असलेला नॉर्थईस्ट युनायटेड संघ आता चौथ्या तर एफसी गोवा 24 गुणानी पाचव्या स्थानावर आहे.
हैदराबाद एफसीने या सामन्यातही दुसऱया सत्रात गोल करण्याची आपली मालिका कायम राखली. या सामन्यात तर त्यांनी चार गोल दुसऱया सत्रात केले. केरळ ब्लास्टर्सचा बचाव काल कप्तान आरिदाने सांताना, फ्रान सँडाझा आणि जुवांव व्हिक्टर यांच्या खेळासमोर फिका पडला. पहिल्या सत्रात या त्रिकुटाला रोखण्यात काही प्रमाणात ब्लास्टर्सने यश मिळविले, मात्र दुसऱया सत्रात त्यांच्या बचावातील मर्यादा हैदराबादी स्ट्रायकर्सनी उघडय़ा पाडल्या.
सामन्याच्या पहिल्या सत्रात केरळ ब्लास्टर्सच्या प्रशांत कारुथाडाथकूनी आणि गॅरी हूपर यांचे गोल करण्याचे यत्न हैदराबाद एफसीचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणीने चपळ गोलरक्षण करून थोपविले. दुसऱया सत्रात 58 व्या मिनिटाला हैदराबाद एफसीने आपले गोलचे खाते खोलले. बचावफळीतील चुकीचा फायदा घेत जॉयल चियानीसेच्या पासवर फ्रान सँडाझाने प्रतिस्पर्धी गोलरक्षक आल्बिनो गोम्सला भेदले व चेंडू जाळीत
सारला.
त्यानंतर 63 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर फ्रान सँडाझाने हैदराबाद एफसीचा दुसरा गोल नोंदविला. जॉयल चियानीसेला गोलरक्षक आल्बिनो गोम्सने बॉक्समध्ये पाडल्याबद्दल रेफ्रीने हैदराबाद एफसीला पेनल्टी फटका बहाल केला होता.
कप्तान आरिदाने सांतानाने लुईश सास्त्रsने केलेल्या फ्रि कीकवर जबरदस्त हेडर घेऊन 86 व्या मिनिटाला तिसऱया गोलची नोंद केली तर शेवटच्या मिनिटाला लुईस सास्त्रsने केलेल्या सेट-पीसवर आरिदाने सांतानाने हेडरने दिलेल्या पासवर जुवांव व्हिक्टरने आल्बिनोला भेदले व चौथा गोल नोंदविला.