प्रतिनिधी/ वास्को
मुरगाव पोलिसांनी एका चोरटय़ाला अटक करून त्याने चोरलेली दुचाकीही हस्तगत केली. शुक्रवारी रात्री चोरीस गेलेली ही दुचाकी दुपारपर्यंत चोरटय़ासह हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले. चोरटय़ाचे नाव विनायक राणे(18) असे आहे.
सिने एलमोंत वास्को येथे पार्क करण्यात आलेली इटर्नो स्कुटर चोरीस गेल्याची तक्रार सदर स्कुटरच्या मालकाने मुरगाव पोलीस स्थानकात केली होती. सदर स्कुटर शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास चोरीला गेली होती. आपली स्कुटर चोरीस गेल्याचे सकाळी सदर मालकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलीस तक्रार केली. पोलिसांनी लगेच चोरटय़ाचा शोध घेण्यास सुरवात केली असता. हेडलॅण्ड सडय़ावरील एमपीटी कॉलनी भागात एक संशयीत दुचाकीवरून पसार होण्याच्या प्रयत्नात असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अडवून ताब्यात घेतले. स्कुटरसह पोलिसांनी त्याला पोलीस स्थानकात आणून चौकशी केली असता त्याने आपण ही स्कुटर शुक्रवारी रात्री चोरल्याचे कबुल केले. त्याच्याकडे असलेल्या एका बनावट चावीने त्याने ही स्कुटर पळवली होती. सदर चोरटा देस्तेरो वास्को येथील असून पोलिसांनी त्याला अटक करून कोठडीत ठेवले आहे.
काही महिन्यांपूर्वी अल्पवयीन असतानाही त्याने हेडलॅण्ड सडय़ावर एका ठिकाणी घरफोडी केली होती. या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटकही केली होती. अल्पवयीन असल्याने त्याला अपनाघरमध्ये ठेवण्यात आले होते. महिनाभरापूर्वीच त्याची अपनाघरातून सुटका झाली होती. मात्र, पुन्हा चोरीत अडकल्याने तो पुन्हा गजाआड झाला आहे. पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साजीत पिल्ले व इतर पोलिसांनी ही कारवाई केली.









