कॉर्नेट, कॅनेपी, फेलिक्स, स्वायटेक, कॉलिन्स, मेदवेदेव्ह, सिनर, सित्सिपस उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/ मेलबर्न
जागतिक क्रमवारीत 61 व्या स्थानावर असणाऱया फ्रान्सच्या ऍलिझ कॉर्नेटने रोमानियाच्या चौदाव्या मानांकित सिमोना हॅलेपला पराभवाचा धक्का देत महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. याशिवाय डॅनियली कॉलिन्स, इगा स्वायटेक, काया कॅनेपी यांनी तर पुरुष एकेरीत डॅनील मेदवेदेव्ह, फेलिक्स ऑगर ऍलियासिमे, यानिक सिनर, सित्सिपस यांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. हॅलेपसह साबालेन्का, एलिस मर्टेन्स, सोराना सिर्स्टिया, ऍलेक्स डी मिनॉर व मारिन सिलिक यांचे आव्हान चौथ्या फेरीत समाप्त झाले.
ऍलिझ कॉर्नेटने दोन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱया हॅलेपवर 6-4, 3-6, 6-4 अशी मात करीत शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. अडीच तास ही लढत रंगली होती. कॉर्नेटची पुढील लढत अमेरिकेच्या 27 व्या मानांकित डॅनियली कॉलिन्सशी होईल. कॉलिन्सने पुन्हा एकदा या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळताना दिसणार आहे. तिने 19 व्या मानांकित एलिस मर्टेन्सवर सुमारे तीन तास चाललेल्या रंगतदार लढतीत 4-6, 6-4, 6-4 अशी मात केली. तिसऱया फेरीतही कॉलिन्सने क्लारा टॉसनविरुद्ध पहिला सेट गमविली होती. 2019 मध्ये तिने या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती, ही तिची ग्रँडस्लॅम स्पर्धेतील आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे.

साबालेन्का पराभूत, स्वायटेकची आगेकूच
अन्य एका सामन्यात सातव्या मानांकित पोलंडच्या इगा स्वायटेकने एका सेटची पिछाडी भरून काढत रोमानियाच्या सिर्स्टियाचा 5-7, 6-3, 6-3 असा पराभव केला. 2020 मध्ये प्रेंच ओपन स्पर्धा जिंकलेल्या 20 वर्षीय स्वायटेकने पहिला सेट गमविल्यानंतर सिर्स्टियावर पूर्ण वर्चस्व राखले आणि पहिल्या मॅचपॉईंटवरच तिने सामना संपवला. तिची पुढील लढत इस्टोनियाच्या काया कॅनेपीशी होईल. कॅनेपीने दुसऱया मानांकित आर्यना साबालेन्काला 5-7, 6-2, 7-6 (12-10) असा पराभवाचा धक्का देत स्पर्धेबाहेर घालविले.
फेलिक्सकडून सिलिक चकित
पुरुष एकेरीत रशियाच्या मेदवेदेव्हला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्याने मॅक्झिम क्रेसीवर 6-2, 7-6 (7-4), 6-7 (4-7), 7-5 अशी मात केली. साडेतीन तास ही झुंज रंगली होती. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा मुकाबला कॅनडाच्या फेलिक्स ऑगर ऍलियासिमेशी होईल. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असणाऱया फेलिक्सने मारिन सिलिकविरुद्ध पहिला सेट गमविल्यानंतर पुढचे तीन सेट जिंकून आगेकूच केली. फेलिक्सने 3 तास 39 मिनिटे चाललेली ही लढत 2-6, 7-6 (9-7), 6-2, 7-6 (7-4) अशी जिंकून सिलिकचे आव्हान संपुष्टात आणले. सिलिकविरुद्ध चार प्रयत्नात त्याने मिळविलेला हा पहिलाच विजय आहे.
सिनर, सित्सिपस विजयी

अन्य एका सामन्यात 11 व्या मानांकित इटलीच्या यानिक सिनरने पहिल्यांदाच या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला असून त्याने स्थानिक खेळाडू ऍलेक्स डी मिनॉरचा 7-6 (7-3), 6-3, 6-4 असा पराभव केला. अडीच तास ही लढत रंगली होती. त्याची पुढील लढत ग्रीसच्या सित्सिपसशी होईल. चौथ्या मानांकित सित्सिपसने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झवर 4-6, 6-4, 4-6, 6-3, 6-4 अशी संघर्षपूर्ण मात केली. ग्रँडस्लॅमची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची त्याची ही पाचवी वेळ आहे.









