बेळगाव-मुंबई रेल्वेसेवा सहा महिन्यांपासून बंद : प्रवाशांमधून सेवा सुरू करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
देशाची आर्थिक राजधानी संबोधल्या जाणाऱया मुंबईला मागील 6 महिन्यांपासून बेळगावमधून रेल्वे बंद आहे. रेल्वे बंद असल्यामुळे प्रवाशांना एकतर पुणे येथून दुसऱया रेल्वेने मुंबई गाठावी लागत आहे, नाही तर आराम बसने अधिकचे पैसे खर्च करून असुरक्षितपणे मुंबईचा प्रवास करावा लागत आहे. लॉकडाऊनपासून गावी न परतलेल्या प्रवाशांना दिवाळीला गावी येण्याची आस लागली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी तरी हुबळी-मुंबई रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून करण्यात येत आहे.
बेळगावमधून मुंबईला जाण्यासाठी हुबळी-एलटीटी (मुंबई) व दादर-पाँडिचेरी (चालुक्मय एक्स्प्रेस) अशा दोन रेल्वे आहेत. परंतु लॉकडाऊन सुरू झाल्यापासून या रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत. मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट ठरल्याने तेथून इतर शहरांना रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. सध्या तेथील व्यवहार पूर्वपदावर येत असून हळूहळू रेल्वे सुरू करण्यात येत आहेत. कोल्हापूर-मुंबई ही महालक्ष्मी एक्स्प्रेस तसेच कोयना एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे आता हुबळी-मुंबई रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाने विचार करणे गरजेचे आहे.
मुंबईला जाणाऱया प्रवाशांना रेल्वे उपलब्ध नसल्याने विमान अथवा आराम बसला प्राधान्य द्यावे लागत आहे. विमानाचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा नाही, तर आराम बसचा प्रवास असुरक्षित आहे. बेळगावमधून पुण्यापर्यंत रेल्वे उपलब्ध असल्याने तेथून दुसऱया रेल्वेने मुंबई गाठावी लागत आहे. दिवाळीच्या काळात मोठय़ा प्रमाणात चाकरमानी गावी परतत असतात. त्यामुळे दिवाळीपूर्वी ही रेल्वे सुरू होणे गरजेचे आहे. ही रेल्वे सुरू झाल्यास हुबळी, बेळगाव, मिरज येथील प्रवाशांना सोयीचे ठरणार आहे.
डब्यांची संख्या वाढविण्याची गरज
एलटीटी रेल्वेला प्रवाशांमधून उत्तम प्रतिसाद देण्यात येतो. त्यामुळेच या रेल्वेचे बुकिंग नेहमी फुल्ल असते. परंतु डब्यांची संख्या अत्यंत कमी आहे. मालवाहक 2 डबे धरून एकूण 18 डब्यांची गाडी धावत आहे. परंतु ही संख्या 22 पर्यंत वाढविणे गरजेचे आहे. यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे.
सतीश तेंडोलकर
अध्यक्ष, सिटिझन्स कौन्सिल
रेल्वेचा प्रवास हा प्रवाशांसाठी सुरक्षित ठरत आहे. स्वच्छतागृह, मोकळी जागा, सामाजिक अंतर हे रेल्वे प्रवासामध्ये राखले जाऊ शकते. परंतु मागील 6 महिन्यांपासून हुबळी-मुंबई ही रेल्वे बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य व नैर्त्रुत्य अशा दोन रेल्वे विभागातून रेल्वे धावत असल्याने ती लवकर सुरू करण्याची मागणी होत असल्याचे त्यांनी सांगितले.









