178 कॅडेट्स ऑफिसर प्रशिक्षणात उत्तीर्ण – 7 अफगाणींसह 25 विदेशी सैनिकांचा समावेश
वृत्तसंस्था / चेन्नई
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत हौतात्म्य प्राप्त झालेले दीपक नैनवाल यांची पत्नी ज्योती शनिवारी सैन्यात अधिकारी झाली आहे. पासिंग आउट परेडमध्ये त्यांची दोन्ही मुले त्यांच्यासोबत होती. सुमारे 3 वर्षांपूर्वी पतीच्या हौतात्म्यानंतर ज्योती यांनी देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला होता.
ज्योती यांनी चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये पार पडलेल्या पासिंग आउट परेडनंतर मी माझ्या पतीच्या रेजिमेंटचे आभार मानू इच्छिते असे म्हटले आहे. रेजिमेंटने माझ्यासोबत मुलीप्रमाणे वर्तन केले आणि प्रत्येक पावलावर साथ दिल्याचे त्या म्हणाल्या. शनिवारी 178 कॅडेट्स ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीतून यशस्वीपणे बाहेर पडले आहेत. यात 124 पुरुष आणि 29 महिलांचा समावेश आहे.
देहरादूनच्या हर्रावालचे रहिवासी नायक दीपक नैनवाल 10 एप्रिल 2018 रोजी जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत जखमी झाले होते. त्यांना 3 गोळय़ा लागल्या होत्या. एक महिन्यापर्यंत मृत्यूशी झुंज दिल्यावर 20 मे 2018 रोजी दीपक यांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. यानंतर त्यांच्या पत्नी ज्योती यांनीही पतीप्रमाणेच देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला होता. ज्योती यांना 2 अपत्य असून मुलगी लावण्या चौथीत शिकत आहे. तर मुलगा रेयांश पहिलीत शिकतोय.









