प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्राने शेतकरीविरोधी जी तीन कायदे केले आहेत ते रद्द करावेत. या मागणीसाठी संपूर्ण देशामध्ये शेतकऱयांनी आंदोलन छेडले आहे. बेळगाव येथील शेतकऱयांनी हिरेबागेवाडी आणि चिक्कबागेवाडी येथे रास्तारोको करून केंद्र सरकारचा जोरदार निषेध नोंदविला. दुपारी 12 च्या सुमारास शेतकऱयांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याने राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 10 कि.मी. लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱयांना ताब्यात घेत रस्ता मोकळा केला.
केंद्र सरकारने जाचक तीन कायदे काढले आहेत. त्या कायद्यांच्या विरोधात शेतकरी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करत असताना शनिवारी त्याला पाठिंबा म्हणून देशभरातील शेतकऱयांनी आंदोलन छेडले. हिरेबागेवाडीजवळ दुपारी शेतकरी हजर झाले. त्यानंतर अचानक रस्त्यावरच ठाण मांडून बसले. भर उन्हात शेतकऱयांनी हे आंदोलन छेडले. यावेळी पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. केंद्राने जे कायदे केले आहेत. ते तातडीने रद्द करावेत, त्यासाठी शेतकरी केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत आहेत.









