केंद्रीयमंत्री शोभा करंदलाजे यांचे काँग्रेसला आव्हान
प्रतिनिधी/ बेंगळूर
काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये बजरंग दलावर योग्य कारवाई करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे साहजिकच हिंदुत्ववादी संघटनांच्या भावना दुखावल्या आहेत. काँगेसच्या या घोषणेला भाजप नेत्या आणि केंद्रीयमंत्री शोभा करंदलाजे यांनी आक्षेप घेतला आहे. हिंमत असेल तर बजरंग दलावर बंदी घालून दाखवा, असे आव्हान त्यांनी काँग्रेस नेत्यांना दिले आहे.
बेंगळूरमध्ये पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, केंद्र सरकारने यापूर्वीच पीएफआय संघटनेवर बंदी घातली आहे. परंतु, काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये पीएफआय आणि बजरंग दलावर बंदी घालणार असल्याचे सांगितले आहे. या पक्षाचे मुख्य टार्गेट पीएफआय नव्हे; तर बजरंग दल आहे. काँग्रेसने पीएफआय आणि बजरंग दलाला तराजूच्या एकाच पारड्यात तोलले आहे. पीएफआयशी देशप्रेमी बजरंग दलाची तुलना करणे योग्य नाही, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
बजरंगबलीला बांधून ठेवण्याचा प्रयत्न : मोदी
पंतप्रधान नरेंद मोदी मंगळवारी विजयनगर जिल्ह्यातील होस्पेट येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाले होते. यावेळी प्रचारसभेत त्यांनी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यावरून त्या पक्षातील नेत्यांवर सडकून टीका केली. आपण हनुमानाच्या भूमीवर नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. मात्र, याच वेळेला काँग्रेसने बजरंगबलीला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण हनुमंताच्या पायाशी नतमस्तक होऊन कर्नाटकाच्या प्रतिष्ठेला आणि संस्कृतीला धक्का पोहोचू देणार नाही, अशी प्रतिज्ञा करीत आहे, असे सांगितले.
काँग्रेसने विश्व हिंदू परिषदेची युवा संघटना असलेल्या बजरंग दलाची तुलना पीएफआय संघटनेशी केली आहे. बहुसंख्याक किंवा अल्पसंख्याक समुदायांमध्ये द्वेषभावना पसरविणाऱ्या संघटनांवर बंदी घालणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, या पक्षाने देशहितासाठी काय केले, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात कर्नाटकाला देशातील ‘नंबर वन’ राज्य बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. समान नागरी कायदा जारी, उत्पादन क्षेत्रात 10 लाख रोजगार देण्याची घोषणा भाजपने केल्याचे समर्थन पंतप्रधानांनी केले.
उडुपीत भाजप कार्यकर्त्यांकडून संताप
काँग्रेसने जाहीरनाम्यान बजरंग दलावर बंदी घालणार असल्याचे सांगताच भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. उडुपीत राष्ट्रीय महामार्ग क्र. 169 वर भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची प्रत जाळली. तसेच सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांच्याविरोधात धिक्काराच्या घोषणा दिल्या.
गदगमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारावेळी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले, जाहीरनाम्याच्या नावाने काँग्रेसने जनतेची दिशाभूल चालविली आहे. काँग्रेसने घोषणा केलेल्यापैकी अनेक योजना आपल्या सरकारने यापूर्वीच जारी केल्या आहेत, असे सांगितले.









