निपाणीत डॉ. हेगडेवार विशेषांक प्रकाशन सोहळा
प्रतिनिधी /निपाणी
भारताने सर्वसमावेशक असे सुंदर तत्त्वज्ञान जगाला दिले. मात्र त्यानंतर सुमारे दोन हजार वर्षे परकीय आक्रमणेच सहन केली. यामुळेच हिंदू संस्कृतीवर अनेक आघात झाले. हे लक्षात घेऊन भारत देशात राहणारा प्रत्येक माणूस हिंदू असून हिंदू संघटन ही काळाची गरज आहे, हा विचार रुजण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांतप्रचारक विजयकुमार जोशी यांनी केले.
येथील अक्कमहादेवी कल्याण मंडपात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे संघमंत्राचे उद्गाते डॉ. हेगडेवार या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संघाचे दक्षिण कोल्हापूर जिल्हा कार्यवाह डॉ. दत्तात्रय गर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
जोशी म्हणाले, भारतात सहाव्या शतकापर्यंत स्त्रियांना पूर्ण अधिकार होते. त्यानंतर परकीय आक्रमणांमुळे व परकीयांनी केलेला शिक्षण, सामाजिक पद्धतीतील बदलामुळे स्त्रियांचे अधिकार मर्यादित झाले. परकीय आक्रमण रोखण्यासाठी क्रांतिकारकांनी लढाया केल्या. मात्र पूर्ण समूह म्हणून त्यांना त्याकाळी पाठिंबा मिळाला नाही. भविष्यात पुन्हा अशी आक्रमणे कधीही होऊ नयेत यासाठी हिंदू संघटन हाच उद्देश हेगडेवारांनी डोळय़ासमोर ठेवला. त्यांनी 1925 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करून 1940 पर्यंत देशाच्या प्रत्येक प्रांतात संघटना पोहोचवली, असे सांगितले.









