राजस्थानमधील घटनेचे देशभर तीव्र पडसाद
उदयपूर / वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ संदेश प्रसारित केल्यामुळे राजस्थानातील उदयपूर शहरात कन्हय्यालाल तेली याचा शिरच्छेद करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी 2 मुस्लिमांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात युएपीए हा कठोर कायदा लावण्यात आला असून या व्यक्तींचे आयएसआयएस या इस्लामी दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे प्राथमिक तपासातून आढळून आले आहे. हे प्रकरण आता राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकारणाने (एनआयए) आपल्या हाती घेतले असून या धर्मांध गुन्हेगारांना फासावर चढवावे, अशी मागणी देशभरातून होत आहे. उदयपूर शहरातील वातावरण कमालीचे तणावग्रस्त असून या घटनेच्या निषेधार्थ हजारो लोकांनी निदर्शने केली. अटक करण्यात आलेल्यांची नावे रियाझ अक्तारी आणि गौस मोहम्मद, अशी आहेत.
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी गेल्या महिन्यात एका टीव्ही चर्चेत भाग घेताना प्रेषित मोहम्मद यांच्यासंबंधी काही टिप्पणी इस्लामी ग्रंथांचा आधार घेत केली होती. हा प्रेषितांचा घोर अपमान आहे, अशा समजुतीने मुस्लिमांनी मोठय़ा प्रमाणात निदर्शने केली. तसेच काही शहरांमध्ये जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. जगभरात याचे पडसाद उमटले आणि अनेक मुस्लीम देशांनी भारत सरकारचा निषेध केला होता. नंतर भाजपने नुपूर शर्मा यांना निलंबित केले होते. या प्रकरणाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत.
उदयपूरमध्ये नेमके काय घडले?
नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ येथील कन्हय्यालाल तेली नामक एका हिंदू व्यावसायिकाने सोशल मीडियावर एक संदेश प्रसारित केला. प्रत्यक्षात हा संदेश या व्यक्तीच्या आठ वर्षांच्या मुलाने सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रसारित केला होता, असेही समजते. नंतर कन्हय्यालाल तेली यांना धमक्या येऊ लागल्या. त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार सादर करून संरक्षणाची मागणी केली. मात्र, पोलिसांनी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले, असा आरोप होत आहे.
निर्घृण हत्या
मंगळवारी तेली त्यांच्या टेलरिंग दुकानात काम करत असताना दोन व्यक्ती झब्बा शिवून घेण्याच्या निमित्ताने दुकानात शिरल्या. त्यांनी तलवारसदृश्य धारदार शस्त्राने तेली यांच्यावर हल्ला करून त्यांचे शीर धडावेगळे केले. दिवसाढवळय़ा हे भीषण हत्याकांड घडले. ‘तू आमच्या प्रेषितांविरोधात लिहिले आहेस, तुला जगण्याचा अधिकार नाही, तुला तुझ्या कृतीचे परिणाम भोगावे लागतील’, अशी वाक्ये हल्लेखोरांनी शिरच्छेद करत असताना उच्चारली होती, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या हल्ल्यात तेली जागीच मरण पावले होते.
संतप्त प्रतिक्रिया
या घटनेनंतर उदयपूर शहरात कमालीचा तणाव निर्माण झाला. लोकांनी रस्त्यावर उतरून हल्लेखोरांच्या निषेधार्थ निदर्शने केली. राज्य सरकारने त्वरित संचारबंदी लागू केली. संपूर्ण राजस्थानात एक महिना जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या घटनेचा निषेध केला.
दोघांना अटक
या हत्या प्रकरणात तेली यांच्या मुलाने तक्रार सादर केल्यानंतर एका दिवसात दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. एनआयएने या प्रकरणाचा तपास हाती घेतला असून आरोपींचे कोणाकोणाशी संबंध आहेत, याची चौकशी सुरू आहे. त्यांचा संबंध आयएसआयएस या इस्लामी दहशतवादी संघटनेशी आहे, असे दिसून आल्याने त्यांच्यावर बेकायदा संघटित गुन्हे कायदा (युएपीए) लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
बॉक्स
पाकिस्तानात प्रशिक्षण
दोन्ही आरोपींनी पाकिस्तानातील कराची येथील मदरशांमध्ये प्रशिक्षण घेतल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही आरोपी बरेलवी या जहाल दहशतवादी गटाचे हस्तक असल्याचेही समजते. या दोघांनाही त्यांच्या फेसबुक पोस्टच्या आधारावर अटक करण्यात आली होती. त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे.
बॉक्स
पंतप्रधान मोदींनाही धमकी
आरोपींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मारण्याची धमकी त्यांच्या पोस्टवरून दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण वरवर दिसते तसे नसून याची पाळेमुळे खोलवर रुजलेली असावीत, असा संशय आहे. त्यादृष्टीने ही हत्या ही एक भीषण दहशतवादी घटना आहे, अशाप्रकारे तपास करण्यात येत आहे.