प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीसाठी पायाभरणी नुकतीच झाली. विज्ञान प्रयोगशाळा व ग्रंथालयाच्या इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे. डॉ. अरुणा पावशे यांच्या हस्ते कॉलमची पूजा करण्यात आली. अध्यक्षस्थानी एसडीएमसीचे अध्यक्ष युवराज अगसगेकर होते.
अमेरिकेतील प्रसिद्ध येल विश्वविद्यालयाच्या प्राध्यापिका व हिंडलगा मराठी शाळेच्या माजी विद्यार्थिनी डॉ. अरुणा पावशे यांच्या प्रयत्नातून व ‘गो फंड मी’च्या मदतीमधून सुसज्ज इमारत उभारण्यात येत आहे. प्रयोगशाळा व ग्रंथालयाची इमारत लवकरात लवकर उभी रहावी, अशी सदिच्छा डॉ. अरुणा पावशे यांनी व्यक्त केली. ग्राम पंचायत व ग्रामस्थांच्या मदतीने एका आदर्श शाळेची निर्मिती करावयाची आहे, असे त्यांनी आपल्या मनोगतातून विचार व्यक्त केले.
यावेळी एसडीएमसी सदस्य मकरंद लाड, रमेश पावशे उपस्थित होते. सहशिक्षक सागर हराडे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षकवृंद व एसडीएमसी सदस्यांनी डॉ. अरुणा पावशे यांचे आभार मानले. इंजिनिअर अवधूत सायनेकर यांनी काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.









