वार्ताहर / हिंडलगा
हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱया विजयनगर येथील विविध ठिकाणच्या रस्ता डांबरीकरण कामांचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला. यासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या फंडातून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून विजयनगर परिसरातील रस्ते मोठय़ा प्रमाणात खराब झाले होते. त्यामुळे परिसरातील रहिवाशांसह वाहनधारकांना खड्डय़ांतून प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याबाबत नागरिकांनी रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी केली होती.
याची दखल घेत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शासनामार्फत एक कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्यानुसार सोमवारी आमदार हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रत्यक्ष डांबरीकरण कामाला सुरुवात करण्यात आली. तसेच नागरिकांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे परिसरातील रहिवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य राहुल उरणकर, रामचंद्र कुदेमानीकर, गजानन बांदेकर, अशोक कांबळे, डी. बी. पाटील, विठ्ठल देसाई, उमा सोनवडेकर, ज्योती घाटगे, चेतना अगसगेकर यांच्यासह परिसरातील रहिवासी उपस्थित होते.









