कैद्यांच्या सुटकेच्या यादीत होते नाव
प्रतिनिधी / बेळगाव
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील एका वृध्द कैद्याचा हृदया घाताने मृत्यू झाला आहे. सोमवारी पहाटे ही घटना घडली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वागणुकीत सुधारणा असल्याने ज्या कैद्यांची सुटका करणार होते त्या यादीत या वृध्दाचे नाव होते.
राजप्पा हणमंताप्पा खनदळ्ळी (वय 65) असे त्याचे नाव आहे. राणेबेन्नूर येथील एका खून प्रकरणात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. सुरुवातीला धारवाड येथील कारागृहात त्याला स्थानबध्दतेत ठेवण्यात आले होते.
3 ऑक्टोबर 2005 रोजी त्याला हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले होते. तेंव्हापासून तो याच कारागृहात होता. रविवारी सायंकाळपर्यंत या कैद्याने नियमीत कामेही केली आहेत. पहाटे त्याला हृदयविकाराचा झटका आला. तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलविताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कट्टी यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देवून पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली. कारागृह प्रशासनाने हासन येथील या वृध्दाच्या कुटुंबियांनाही घटनेची माहिती दिली. ते बेळगावात दाखल झाल्यानंतर कारागृहाच्या स्मशानभूमीत रात्री त्याच्यावर अंत्यक्रिया करण्यात आली.









