वृत्तसंस्था/ कोवलून, हाँगकाँग
रविवारी इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद मिळविणाऱ्या भारताच्या किरण जॉर्जला येथे सुरू झालेल्या हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य ड्रॉ मध्ये प्रवेश मिळविण्यात अपयश आले. पात्रता फेरीतच त्याचे आव्हान संपुष्टात आले.
पात्रता लढतीच्या दुसऱ्या फेरीत त्याला मलेशियाच्या जुन हाओ लिआँगकडून 20-22, 21-14, 14-21 असा पराभव स्वीकारावा लागला. त्याआधी त्याने पहिल्या फेरीत चिनी तैपेईच्या यु जेन चि याचा 21-15, 21-17 असा पराभव केला होता. मिथुन मंजुनाथ व रवी यांचे आव्हानही पात्रता फेरीत समाप्त झाले. दोघेही हाँगकाँगच्या खेळाडूंकडून पराभूत झाले. मंजुनाथ जेसन गुनावनकडून पहिल्या फेरीत 20-22, 15-21 असा तर रवी 15-21, 14-21 असा दुसऱ्या फेरीत त्याच्याचकडून पराभूत झाला.
महिला एकेरीत मालविका बनसोडने मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळविले असून तिची थायलंडची प्रतिस्पर्धी पिचमन ओपातनिपुथ 14-21, 10-11 असे आघाडीवर असताना दुखापतीमुळे माघार घेतल्याने मालविकाला पुढे चाल मिळाली. महिलांच्या दुहेरीत त्रीशा जॉली व गायत्री गोपीचंद यांनी दुसऱ्या फेरीत स्थान मिळविताना हॉलंडच्या देबोरा जिली व चेरील सीनेन यांच्यावर 21-15, 16-21, 21-16 अशी मात केली. आणखी एक जोडी तनिशा क्रॅस्टो व अश्विनी पोनप्पा यांना मात्र चिनी तैपेईच्या चिआ सिन ली व चुन सुन तेंग यांच्याकडून मुख्य स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्याआधी त्यांनी पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत आपल्याच देशाच्या एन.सिक्की रे•ाr व आरती सारा सुनील यांना 21-16, 21-14 असे हरवून मुख्य स्पर्धेत स्थान मिळविले होते.









