दाबोळीच्या धावपट्टीवरील घटना
प्रतिनिधी/ वास्को
धावपट्टीवर उ•ाणाच्या प्रतीक्षेत असलेल्या विमानाच्या आपत्कालीन दरवाजाला एका प्रवाशाचा चुकून हात लागला. दरवाजाचे हॅण्डल खेचले गेले. त्यामुळे विमानात तांत्रिक बिघाड निर्माण होऊन या विमानाला दुसऱ्या दिवशी उड्डाण करावे लागले. दाबोळी विमानतळावर ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली. या चुकीप्रकरणी दाबोळी विमानतळ पोलीस स्थानकात सदर प्रवाशाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
इंडिगो एअरलाईन्सचे हे विमान दाबोळीहून चंदीगढला उड्डाण करणार होते. प्रवासी विमानात आसनस्थ होणे सुरू होते. या दरम्यान हिमाचल प्रदेशमधील विशाल शांडिल्य या अठ्ठावीस वर्षीय प्रवाशाने चुकून विमानाच्या आपत्कालीन दरवाजाचे हॅण्डल खेचले. त्यामुळे तो दरवाजा किंचित उघडला गेला. या प्रवाशालाही त्याचा अंदाज आला नाही. मात्र, वैमानिकाने जेव्हा उड्डाणासाठी प्रयत्न केला त्यावेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे त्याच्या लक्षात आले. अधिक तपासणीत विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला गेल्याचे उघडकीस आले. या प्रकारामुळे ते विमान उ•ाण करू शकले नाही. सर्व प्रवाशांना खाली उतरवावे लागले. या विमानात 179 हवाई प्रवासी होते. त्या प्रवाशाच्या चुकीमुळे निर्माण झालेला विमानातील तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी हे विमान धावपट्टीवरच थांबवावे लागले. या विमानातील तांत्रिक बिघाड दूर करून शुक्रवारी हे विमान चंदीगढला रवाना झाले.
सदर गुन्ह्याप्रकरणी हवाई कंपनीतर्फे दाबोळी पोलीस स्थानकात तक्रार नोंद होताच पोलिसांनी प्रवाशाविरुद्ध गुन्हा नोंद केला. सदर प्रवाशाने खरेच चुकून किंवा निष्काळजीपणे त्या दरवाज्याचे हॅण्डल खेचले होते की त्याचा अन्य काही हेतू होता याचा तपास दाबोळी पोलीस करीत आहेत.









