अनगोळ येथील युवक मंडळाचा प्रयत्न, साकारला कोप्पळचा किल्ला
प्रतिनिधी /बेळगाव
दिवाळीच्या दरम्यान बालचमुंसह युवक किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करतात. या किल्ला बनविण्याच्या कलेमध्ये नाविन्यता यावी व अधिकाधिक तरुणांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचावा या उद्देशाने रघुनाथपेठ अनगोळ येथील शिवनेरी युवक मंडळाने कोप्पळ किल्ल्याची भव्य प्रतिकृती तयार करून त्यावर हलता देखावा तयार केला आहे. बेळगावमध्ये प्रथमच अशा प्रकारचा किल्ल्यावर हलता देखावा सादर करण्यात आल्याने हा किल्ला चर्चेचा विषय ठरत आहे.
शिवनेरी युवक मंडळ दरवषीच नाविन्यपूर्ण असे किल्ले तयार करते. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे असलेली मरगळ दूर करून भव्य असा कोप्पळ किल्ला युवकांनी साकारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिम आखल्यानंतर पहिली चढाई ही कोप्पळच्या किल्ल्यावर केली. या किल्ल्यावर मराठा व पठाण सैन्यामध्ये जोरदार लढाई झाली. या लढाईत मराठा सैन्याने आपले शौर्य दाखवून दिले होते. याचीच आठवण म्हणून युवकांनी कोप्पळ हा किल्ला तयार केला आहे.
दीड महिन्याच्या परिश्रमानंतर साकारला किल्ला
किल्ला व हलता देखावा सादर करण्याच्या उद्देशाने युवकांनी प्रयत्न सुरू ठेवले होते. परंतु किल्ल्याची माहिती घेऊन त्या प्रमाणे किल्ला साकारण्यास विलंब झाला. त्यातच दिवाळीपासून अवकाळी पाऊस सुरूच असल्याने किल्ला करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे दीड महिन्याच्या अथक परिश्रमानंतर हा किल्ला साकारला. हलत्या देखाव्यासाठी बाहुल्यांचा वापर करण्यात आला आहे.
मंडळातर्फे दरवषी नाविन्यपूर्ण किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांचा वरवरचा इतिहास आपल्याला माहित आहे. परंतु आजच्या युवा पिढीला संपूर्ण इतिहास समजावा या उद्देशाने मंडळातर्फे दरवषी नाविन्यपूर्ण किल्ला तयार केला जातो. यापूर्वी प्रोजक्टरच्या सहाय्याने किल्ल्याची माहिती देण्याचा प्रयत्न मंडळाने केला होता. यावषी देखाव्याच्या माध्यमातून किल्ल्यावरील पराक्रम अधोरेखीत करण्यात आल्याचे संदीप सुंठकर यांनी सांगितले.
संदीप सुंठकर
नाविन्यपूर्ण माहिती देण्याचा मंडळाचा प्रयत्न

दक्षिण मोहिमेतील पहिली चढाई महाराजांनी कोप्पळ या किल्ल्यावर केली. दक्षिण मोहिमेविषयी शिवप्रेमिंना तितकेसे माहिती नसल्याने हा किल्ला बनविण्यात आला आहे. बेळगाव परिसरात अनेक ठिकाणी किल्ले बनविले जातात. परंतु तेच तेच किल्ले होत असल्याने पाहण्यासाठी येणाऱया विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे नवीन किल्ल्याची माहिती देण्याचा मंडळाचा प्रयत्न असल्याचे सुशांत जाधव यांनी सांगितले.
सुशांत जाधव









