प्रतिनिधी/ सातारा
यंदा आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे राज्य शासन व केंद्र शासनातर्फे आझादी का अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत केंद्र शासनातर्फे ‘हर घर झंडा’ या उपक्रमाची नुकतीच घोषणा करण्यात आली, पण या उपक्रमांमध्ये ही वारंवार बदल होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होत आहे.
‘हर घर झंडा’ उपक्रमांतर्गत प्रत्येकाने आपापल्या घरावर ध्वज फडकविण्याचा अनोखा उपक्रम राबविण्याचा आहे. हा निर्णय प्रत्येकी ऐच्छिक आहे. पण पहिला दि. 11 ते 17 ऑगस्ट पर्यंत ध्वजारोहणाचा निर्णय घेण्यात आला होता. पण पुन्हा यामध्ये बदल करून आता दि. 13 ते 15 सलग तीन दिवस हा उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले आहे.
त्यातच आपल्या राष्ट्रध्वजाबाबत ही संहिता असून, आता या संहितेत ही काही प्रमाणात बदल करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यामध्ये मुख्य म्हणजे ध्वजारोहन हे सुर्योदय ते सुर्यास्तापर्यंत फडकविण्याची परवाणगी असते, पण आता हा ध्वज या उपक्रमांतर्गत सलग तीन दिवस रात्रंदिवस फडकविण्याची परवाणगी देण्यात येणार आहे. तसेच पॉलिस्टरपासुन बनविलेल्या व मशिनवर बनविलेल्या ध्वजांना ही परवाणगी देण्यात येणार आहे.
सर्वांना राष्ट्रध्वज उपलब्ध होणार का ?
शासनातर्फे ध्वजाचा पुरवठा करण्यात येणार आहे, पण ध्वजारोहणाकरीता लागणाऱया काठीची व्यवस्था ही प्रत्येकाने आपापली करायची आहे. जिल्हय़ात एकूण 7 लाख 47 हजार 75 इतकी घरांची संख्या असून प्रत्येकालाच आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल प्रेम आहे, त्यामुळे इतक्या प्रमाणातील ध्वज ही उपलब्ध ही होणार का? असा प्रश्न ही सद्या उपस्थित होत आहे.








