प्रतिनिधी/ पणजी
पोलीस खात्याच्या अमलीपदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) हरमल पेडणे येथे बेधडक कारवाई करून ड्रग्स विरोधातील ऑपरेशन यशस्वी पेले आहे. हरमल परिसरात तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल 34 लाख 95 हजार रुपये किमतीचा चरस जप्त केला असून तीन संशयितांना अटकही केली आहे. तिघेही संशयित परप्रांतातील आहेत. एएनसीने 28 रोजी रात्री 7 वाजता कारवाईला सुरुवात केली आणि ती 29 रोजी सकाळी 7.30 वाजेपर्यंत सुरु होती. डिसेंबरमध्ये मोठय़ा प्रमाणात होणाऱया पाटर्य़ांसाठी हा चरस आणल्याचा संशय आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्येची छात्रा सिंग उर्फ शिवा (36 उत्तराखंड), चंदन जलाम सिंग (35 राजस्थान) व राजूलाल रामबाहादुर लामा (35 हिमाचल प्रदेश) यांचा समावेश आहे. त्यांना आज रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल.
पर्यटक बनून ड्रग्ज विक्रीचा व्यवसाय
तिघेही संशयित पर्यटक म्हणून गोव्यात आले असता हरमल येथील विविध ठिकाणी भाडय़ाच्या खोलीत राहत होते. तिघांचाही उद्देश ड्रग्स विक्री करण्याचाच होता, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. तिन्ही संशयितांकडून सुमारे 6 किलो 990 ग्राम चरस जप्त करण्यात आला आहे.
विदेशी पर्यटकच छात्राचे ‘टार्गेट कस्टमर’
छात्रा सिंग उर्फ शिवा हा सराईत ड्रग्स विक्रेता आहे. परप्रांतातून ड्रग्स आणून गोव्यात विक्री करीत असायचा. गोव्यात मोठय़ाप्रमाणात विदेशी पर्यटक येत असल्याने चरसला चांगला भाव मिळत असतो. त्यामुळे संशयित पर्यटक बनून गोव्यात खास ड्रग्सची विक्री करण्यासाठी येत होता, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. ड्रग्सची विक्री करीत असताना संशयित पुरेपूर खबरदारी घेत होता. तो केवळ विदेशी नागरिकानांच ड्रग्स विकत होता.
दोन महिन्यांपूर्वीच एएनसीला मिळाली होती माहिती
छात्राबाबत दोन महिन्यापूर्वीच पोलिसांना माहिती मिळाली होती. गेल्या दोन महिन्यांपासून एएनसी पोलीस संशयिताच्या मागावर होते. मात्र तो जाळ्यात सापडत नव्हता, अखेर शनिवारी 28 रोजी संशयिताला रंगेहात अटक करण्यात आली. त्याच्याकडून 2 किलो 100 ग्राम चरस जप्त करण्यात आला आहे. बाजार भावाप्रमाणे त्याची किमंत 10 लाख 50 हजार रुपये आहे.
सापळा रचून छात्राला दांडो येथे रंगेहात अटक

छात्रा हा दांडो हरमल येथील बर्नाड फर्नांडिस यांच्या मालकीच्या खोलीत भाडय़ाने राहत होता. तो चरस घेऊन गोव्यात आला असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांकडून पोलिसांना मिळाली होती. एक बनावट ग्राहक तयार करून संशयिताकडे चरस आणण्यासाठी पाठविण्यात आला. त्याचवेळी पोलीस सापळा रचून बसले होते. बनावट ग्राहकाला संशयित ड्रग्स देणार त्याचवेळी त्याला रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी 28 रोजी रात्री 7.20 ते 10.50 दरम्यान करण्यात आली.
गिरकरवाडय़ात आवळल्या चंदनसिंगच्या मुसक्या

संशयित छात्र याची रात्रभर कसून उलट तपासणी केली असता त्याने इतर दोन संशयितांची नावे उघड केली. पोलिस त्वरित त्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले होते. गिरकरवाडा हरमल येथील बनियान ट्री येथे संशयित चंदन सिंग हा ग्राहकाची वाट पाहत उभा असतानाच त्याला ताब्यात घेतले व त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे 2 किलो 390 ग्राम चरस मिळाला. त्याला अटक करण्यात आली. बाजार भावाप्रमाणे त्याची किमंत 11 लाख 95 हजार रुपये इतकी किमंत आहे. ही कारवाई 29 रोजी पहाटे 4.35 ते 7.05 दरम्यान करण्यात आली आहे.
केपकरवाडय़ातील कारवाईत राजूलाल सापडला जाळय़ात

राजूलाल रामबाहादुर लामा या तिसऱया संशयिताला केपकरवाडा हरमल येथे अटक करून त्याच्याकडील 2 किलो 500 ग्राम चरस जप्त करण्यात आला आहे. बाजार भावाप्रमाणात त्याची किमंत 12 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. तिन्ही संशयितांच्या विरोधात एनडीपीस कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे.
एएनसी अधीक्षक महेश गावकर उपअधीक्षक मडकईकर, निरीक्षक सुरज हळर्णकर, सिताकांत नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरूण देसाई, प्रियांका सावंत, रोहन मडगावकर, प्रितेश मडगावकर व त्यांच्या टीमने ही कारवाई केली आहे.
पर्यटक बनून ड्रग्ज व्यवसाय करणाऱयांच्या संख्येत वाढ
लॉकडाऊनच्या काळात गोव्यात पर्यटन व्यवसाय बंद होता. त्यामुळे परदेशातील किंवा परप्रांतातील पर्यटक गोव्यात येत नव्हते. त्यामुळे पर्यटक बनून ड्रग्स विक्री करण्यासाठी गोव्यात येणाऱयांची संख्या कमी झाली होती. नंतर काही महिन्यानंतर लॉकडाऊन काढण्यात आले आणि राज्याच्या सीमा खुल्या केल्यानंतर देशी विदेशी पर्यटक यायला सुरुवात झाली. पर्यटकांसोबत परप्रांतातील ड्रग्स विक्रेतेही पर्यटक बनून गोव्यात येऊ लागले आहेत. पोलिसांना त्यांची माहिती मिळाली होती आणि पोलीस त्यांच्या शोधात होते. अखेर शनिवार व रविवारी कारवाई करून ड्रग्स विरोधातील ऑपरेशन यशस्वी करण्यात आले.









