पतियाळा / वृत्तसंस्था
भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला कोरोनाची बाधा झाल्याचे सोमवारी निष्पन्न झाले. कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्यानंतर तिची चाचणी घेतली गेली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
हरमनप्रीत कौर लखनौमध्ये संपन्न झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत सहभागी झाली नव्हती. दि. 17 मार्च रोजी झालेल्या पाचव्या वनडे सामन्यात दुखापत झाल्याने तिला टी-20 मालिकेत खेळता आले नाही. सोमवारी सौम्य ताप जाणवल्यानंतर तिने चाचणी करवून घेतली होती.
‘हरमनप्रीत कौर सध्या घरीच आयसोलेशनमध्ये आहे. तिची काल चाचणी घेण्यात आली होती आणि त्याचा अहवाल आज आला आहे. मागील चार दिवसांपासून तिला कणकण होती आणि ही कणकण कमी होत नसल्याने तिची चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. इतका अपवाद वगळता सध्या ती स्वस्थ आहे आणि लवकरच बरी होईल’, असे तिच्या एका निकटवर्तीयाने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
‘दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेदरम्यान हरमनप्रीतची सातत्याने चाचणी होत होती. याचदरम्यान केव्हातरी तिला कोरोनाची बाधा झाली असावी’, असा अंदाज या निकटवर्तीयाने व्यक्त केला. हरमनप्रीतने वनडे मालिकेत उत्तम प्रदर्शन साकारताना एक अर्धशतक साजरे केले तर एकदा 40 धावांची मजल गाठली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षानंतर पुनरागमन करताना भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे व टी-20 अशा दोन्ही मालिका गमवाव्या लागल्या आहेत.









